राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
ठाणे: भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राची समृद्ध परंपरा अधोरेखित करणाऱ्या ठाण्यातील पं. मुकुंद मराठे यांच्यासह महाराष्ट्रातील दहा मान्यवर कलावंतांचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वर्ष २०२४ आणि २०२५ चे संगीत नाटक अकादमी आज पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित या दिमाखदार सोहळ्यास केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राव इंद्रजीत सिंह, विवेक अग्रवाल आणि संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुकुंद राम मराठे हे प्रसिद्ध शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक, संगीतकार आहेत. त्यांना २०११ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ मिळाला आहे. वडिलांच्या सहवासात आणि मार्गदर्शनाखाली संगीताचे बाळकडू मिळाले. पं. उल्हास कशाळकर, यशवंत देव यांच्यासह अनेक दिग्गजांकडे त्यांनी संगीत व तबला-पखवाजचे शिक्षण घेतले. शास्त्रीय संगीत, अनवट रागदारी आणि मराठी संगीत रंगभूमीवरील नाट्यसंगीताचा प्रसार व संवर्धन करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. संगीताप्रमाणेच खगोलशास्त्र व विज्ञान विषयात त्यांचा विशेष अभ्यास व आवड आहे.
वर्ष २०२४ च्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहा कलावंतांचा समावेश आहे. पारंपरिक रंगभूमीसाठी मुकुंद मराठे, हिंदुस्तानी शास्त्रीय गायनासाठी अरुण कशाळकर, अभंग गायनासाठी आनंद भाटे, अभिनयासाठी अरुण नलावडे, लोकनृत्यासाठी सुभाष नकाशे आणि नृत्य क्षेत्रातील संशोधनासाठी शुभदा वरदकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वर्ष २०२५ च्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील चार मान्यवर कलावंतांना गौरविण्यात आले. शहनाई वादनासाठी शैलेश भागवत, दिग्दर्शनासाठी प्रमोद डी. पवार, नाट्यसंगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि कथक नृत्यासाठी मनीषा साठे यांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.