खासदार डॉ. श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री होतील !

माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे यांचे प्रतिपादन

अंबरनाथ : दहा वर्षांपूर्वी निवडून आलेल्या खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात केलेल्या विकास कामांमुळे त्यांच्या कर्तृत्वाची वेगळी छाप पडली आहे. येत्या निवडणुकीत ते विक्रमी मताधिक्याने विजयी होतीलच यात शंका नाही, नंतर ते केंद्रीय मंत्री व्हावेत, आणि पंतप्रधान मोदी त्यांना मंत्रीपद देतील, असा विश्वास माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे यांनी व्यक्त केला.

भाजपा नेत्या आणि माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे संचलित कमलधाम वृद्धाश्रमाला खा. डॉ. शिंदे यांनी भेट दिली. तेथील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. या भेटी दरम्यान झालेल्या कार्यक्रमात पूर्णिमा कबरे बोलत होत्या.

दहा वर्षांपूर्वी कल्याण मतदार संघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता, मात्र दहा वर्षांच्या कालावधीत कल्याणसह अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्यानी डॉ. शिंदे यशस्वी होण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करू, आणि नंतर डॉ. शिंदे केंद्रीयमंत्री व्हावे असा विश्वास पूर्णिमा कबरे यांनी व्यक्त केला. संसदपटू पुरस्कार मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच त्यांना मंत्रीपद देतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्यात सेना भाजपा युती कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते, मात्र तत्कालीन जिल्हाप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युती भक्कम रहावी म्हणून केलेल्या प्रयत्नांना तोड नाही, नंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने विकास राबवला त्यावरून मुख्यमंत्री कसा असावा याचा आदर्श मुख्यमंत्री शिंदे यांनी घालून दिल्याचे पूर्णिमा कबरे म्हणाल्या.

गेल्या दहा वर्षांत कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विकास कामांमुळे कायापालट झाला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवण्यासाठी महायुतीमार्फत प्रयत्न सुरू असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले, मुख्यमंत्री शिंदे यांनी आणि आपण कमलधाम वृद्धाश्रमात येऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद कायम घेतल्याची आठवण खा. शिंदे यांनी करून दिली.

निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने निवडणूक आचारसंहिता संपताच दुसऱ्या दिवशी संबंधितांना कामाचे आदेश दिले जातील, सर्वसामान्यांचे सर्वसामान्यांचे सरकार असल्याने विधायक विकास कामांना नकार नसेल कायम होकार असेल अशी ग्वाही खा. शिंदे यांनी दिली. पूर्णिमा कबरे यांनी खासदार डॉ. शिंदे, यांचे स्वागत केले.

आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, गुलाबराव करंजुले-पाटील, भरत फुलोरे, संजय आदक, सुजाता भोईर, सुभाष साळुंके आदी महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.