कल्याण : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कल्याणात अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शोकाकूल होत हळहळ व्यक्त केली.
कल्याण शहारात, छत्रपती शिवाजी महाराज, सहाजानंद चौक, राष्ट्रवादी पक्ष मध्यवर्ती कार्यालय कल्याण, कल्याण पूर्व पश्चिम परिसरात आपल्या लाडक्या नेत्याला बॅनरच्या माध्यमातून श्रद्धाजंली अर्पण केली. माजी आमदार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली की,विकासाचे राजकारण करणारे नेतृत्व हरपले, अजित दादा नसण्याची उणीव राष्ट्रवादी पक्षासह, महाराष्ट्र राज्याला भासणार, प्रशासनात आपल्या कामाचा पगडा असलेला शिस्त, आणि आपल्या कार्यचा ठसा असणारा लोकनेता पुन्हा होणे नाही असे शिंदे यांनी सांगितले. या घटनेने कल्याणातील त्यांचा चाहतावर्ग पाहता, सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ते, अबाल वृद्धांपासून समाजातील सर्वच स्तरातील वर्गात एकच हळहळ व्यक्त होत असल्याचे चित्र दिसत होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबिवली, अटाळी, मोहने परिसरात दुकाने, ठेलेवाले यांना बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापारी वर्गासह, ठेलेवाले, फेरीवाले यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद करून श्रद्धांजली वाहिली. शिवसेना उपशहरप्रमुख संघटक विलास रंदवे, सदानंद जाधव, कुणाल पाटील, योगेश पगारे, प्रभाकर महाडिक, पंकज पाटील, तुषार कंदेकर, विशाल भोईर आदी सहभागी झाले होते. तर शिवसेना माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, युवासेना उपशहरप्रमुख वैभव पाटील व शिवसेना शाखा वडवली-अटाळी-आंबिवली व आंबिवली व्यापारी संघटना यांच्यातर्फे दुकाने बंद ठेऊन अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बंदमध्ये डॉक्टर आणि मेडीकल स्टोर यांना वगळण्यात आले होते.
मोहोने विभागात दुकाने, रिक्षा व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. अजित पवार यांच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक जे. सी. कटारिया यांनी दिली.
या बंदमध्ये जे. सी. कटारिया, मुकुंद कोट, सुरेश सोनार, विजय काटकर, जयेश पाटील, रमेश कोणकर, दया शेट्टी, विष्णू वाघमारे, नामदेव लोखंडे, संजय वाघमारे फुलोरे, रमेश रोकडे, सचिन पाटील व इतर सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी संपूर्ण मोहोने परिसरात फिरून शांततेने बंदमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती केली.