रशियाच्या सीमेवरील ४४६६ मिटर उंच शिखर
ठाणे : महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 10 वर्षीय ठाणेकर ग्रिहिथा विचारे हिने 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.20 वाजता बाजारडूझू शिखर यशस्वीरित्या सर केले आणि शिखरावर भारतीय ध्वज फडकवला. रशियाच्या सीमेवर वसलेले अझरबैजानमधील सर्वात उंच पर्वत बाझार्डुझू, ४,४६६ मीटर आहे.
रशिया आणि अझरबैजान सीमा सुरक्षा दलांकडून मोहिमेची परवानगी मिळाल्यानंतर ग्रिहिथाने 24 ऑगस्ट रोजी तिच्या वडिलांसह, अझरबैजान मधील एक्स्पेडीशन टीम आणि भारताच्या फ्लाय हाय एक्स्पेडीशन टीमसह चढाई सुरू केली आणि २६ ऑगस्ट रोजी ही मोहीम यशस्वी केली.
हे शिखर सर करून ग्रिहिथाने केवळ तिचा अतुलनीय दृढनिश्चय आणि कौशल्य दाखवले नाही तर माउंट बाजारडुझू हे आव्हानात्मक शिखर जिंकणारी सर्वात कमी वयाची भारतीय बनण्याचा इतिहासही रचला आहे.
ग्रिहिथा वयाच्या सहाव्या वर्षापासून पर्वतारोहण करत आहे, त्यात तिला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत आणि आत्तापर्यंत पर्वतारोहण क्षेत्रात आठ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एक एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तिच्या नावे आहेत.
बाझार्डुझू हे ग्रिहिथाचे चौथे आंतरराष्ट्रीय यश असून ह्या आधी ग्रिहिथाने आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प वयाच्या आठव्या वर्षी तर जगातला सर्वात उंच शिखर (standalone) आफ्रिकामधील माउंट किलीमांजारो आणि मलेशिया येथील माउंट किनाबालु शिखरही वयाच्या नवव्या वर्षी सर केले आहे. ही शिखरे सर करणारी ग्रिहिथा ही सर्वात कमी वयाची भारतीय ठरली आहे.
सह्याद्रीतील वजीर सुळका, नवरा-नवरी सुळका, स्कॉटिश कडा, कळकराई सुळका, डांग्या सुळका असे अनेक कठीण ट्रेक सुद्धा ग्रिहिथाने अतिशय कमी वयात सर केले आहेत. ग्रिहिथाचे माउंट बाझार्डुझूचे यश हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि सर्वत्र तरुण साहसींसाठी प्रेरणादायी आहे.