सिव्हिल रुग्णालयाच्या स्थलांतर काळातही ५० हून अधिक शस्त्रक्रिया

ठाणे : सिव्हिल रुग्णालयाच्या स्थलांतरणाची दररोज धावपळ होत असतानाही, त्या काळात ५० हून अधिक गरीब रुग्णांच्या कठीण शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. निशिकांत रोकडे आणि डॉ. प्रतिक बिस्वास जणू देवदूतांसारखे ठरले होते.

सिव्हील रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होण्यासाठी दीड वर्षांची वाट बघावी लागणार आहे, असे सांगण्यात येते. तोवर रुग्णालयांतील सर्व वॉर्डांमध्ये असलेल्या रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता या रुग्णालयाने घेतली. रुग्णालयाचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरु असताना गेल्या तीन महिन्यांंमध्ये हे डॉक्टर्स रुग्णांची काळजी घेऊन विविध स्वरुपाच्या शस्त्रक्रिया शल्यचिकित्सा विभागातंर्गत करत होते. यामुळे डॉ. निशिकांत रोकडे व डॉ प्रतीक बिस्वास यांनी गेल्या तीन महिन्यांत खाजगी रुग्णालयात होणा-या दुर्बीण आणि लेझर मशिनच्या सहाय्याने हार्निया, पित्ताशय, पोटातील कर्करोगाची गाठ आदी क्लिष्ट स्वरूपाच्या सुमारे ५० हून अधिक महागड्या शस्त्रकिया केल्या.

सहा महिन्यांपूर्वी हॉस्पिटलसंबंधीत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या रुग्णालयातील काही महत्वाचे विभाग अन्यत्र जागेत स्थलांतर करण्यात येतील. रुग्णांना अशावेळी त्रास होणार नाही याची काळजी आरोग्य विभागाने घेतली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्थलांतर पार पडले.

पित्ताशय, पोटातील कर्करोगाची गाठ, हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणद्वारे किंवा लेझर मशीनद्वारे केल्या जातात. खाजगी रुग्णालयात केलेली मूळव्याध शस्त्रक्रिया महाग असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना हा खर्च परवडणारा नसतो. परंतु, ‘सिव्हील’मध्ये या शस्त्रक्रिया लेझर आणि दुर्बीणीद्वारे करण्यात आल्या. स्थलांतरावेळी अशा शस्त्रक्रिया झाल्याने तेथील डॉक्टरांचे कौतुक होत आहे.

दुर्बीण आणि लेझर शस्त्रक्रियेत रुग्णांना त्रास कमी होतो तसेच रक्तस्त्राव आणि वेदना कमी होतात. व शस्त्रक्रिया कमी कालावधीत होते. अ‍ॅनेस्थीसिया विभागाच्या डॉ रूपाली यादव व डॉ प्रियंका महांगडे आणि वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी यांचे शस्त्रक्रिया करताना मोठे योगदान मिळाले, असे प्रशंसोद्गार डॉ. निशिकांत रोकडे (सर्जन, ठाणे) यांनी व्यक्त केले. येत्या काही दिवसांत वागळे इस्टेट येथील आरोग्य विभागाच्या जागेत अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग तयार केला आहे. त्यामुळे रुग्णांना या शस्त्रक्रिया तेथे करण्यात येतील, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.