डोंबिवलीत मनसेला खिंडार; जिल्हाध्यक्ष भाजपात दाखल

माजी नगरसेवक प्रकाश भोईर, सरोज भोईर यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढली
डोंबिवली : गेले १५ दिवस मनसेचे काही वजनदार माजी नगरसेवक भाजपात जाणार या चर्चेला उधाण आले होते. अखेर मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश भोईर सपत्नीक भाजपात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दाखल झाले. यावेळी त्यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाने डोंबिवलीतील भाजपची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश करून मनसेला मोठा धक्का दिला आहे. प्रकाश भोईर यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मी जिथे आहे तिथेच राहणार अशी भूमिका घेतली होती. मात्र परिसरातील कार्यकर्त्यांचा आग्रह आणि आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेऊन अखेर त्यांनी मनसेला रामराम करत भाजपात प्रवेश निर्णय घेतल्याने मनसेला मोठे खिंडार पडले आहे.
प्रकाश भोईर यांचा राजकीय प्रवासही लक्षवेधी असाच आहे. 2015 च्या महापालिका निवडणुकीत ते आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर हे दोघेही अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला आणि पक्षात सक्रिय भूमिका बजावली.
विशेष म्हणजे या प्रवेशावेळी माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक, विभागाध्यक्ष संदीप उर्फ रमा म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांनीही कमळ हाती घेतले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसे एकत्रित निवडणुका लढवणार असताना मनसेचे दोन माजी नगरसेवक सोडून गेल्याने  डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.