फी दरवाढी विरोधात तोडफोड
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये न्यू इंग्लिश हायस्कूल आणि कॉलेजच्या फी वाढी विरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. यावेळी मनसेच्या १० ते १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील नेताजी चौक परिसरातील न्यू इंग्लिश हायस्कूल व जुनिअर कॉलेज फी वाढीच्या विरोधात मनसेच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये घुसून तोडफोड केली आहे. न्यू इंग्लिश हायस्कूलने यावर्षी मोठ्या प्रमाणात फी वाढ केलेली आहे आणि यामुळे पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही या शाळेच्या विरोधामध्ये अनेक आंदोलने झाली, उपोषण सुद्धा करण्यात आले आहे. तरी देखील शाळेतील मुजोर प्रशासनाने याची दखल घेतली नाही. अखेर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात घुसून राडा करत तोडफोड केली आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी १० ते १५ कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.