मनसे पदाधिकाऱ्याची कार जाळली

उल्हासनगर: उल्हासनगरमधील मनसे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्या मनसे कार्यालयाबाहेर उभी असलेली इनोव्हा कार एका अज्ञात बुरखाधारी व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळल्याची घटना बिरला मंदिर परिसरात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात बुरखाधारी व्यक्ती आपली ओळख लपवून मनसे कार्यालयासमोर उभी असलेल्या कारजवळ आला. त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल गाडीवर ओतून तिला आग लावली. गाडी पेटवल्याची संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

उल्हासनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून कार जाळण्यामागील नेमका हेतू आरोपीला अटक केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणामागे राजकीय कटकारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित आरोपीला सोडणार नाही आणि त्याला मनसे स्टाईलने धडा शिकवू, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.