भाईंदर : कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयावर सोमवारी (आज) महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने कर्मचाऱ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला.
कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर महिनाभरात कर्मचाऱ्यांच्या प्राॅव्हिडंट फंडासह इतर मागण्या मार्गी लागणार असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले.
शहराच्या दैनंदिन सफाई आणि घनकचरा वाहतूक करण्यासाठी महापालिकेने मे. ग्लोबल वेस्ट सेस मॅनेजमेंट व मे. कोणार्क एंटरप्राइज या दोन ठेकेदारांना ठेका दिला आहे. दोन्ही ठेकेदारांचे मिळून सुमारे १८०५ कंत्राटी सफाई कर्मचारी कार्यरत असून किमान वेतन कायद्यानुसार त्यांना वेतन देण्यात येत असले तरी ग्रॅज्युईटी, प्राॅव्हिडंट फंड व इतर मागण्या प्रलंबित राहिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष केतन नाईक यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
पालिका अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्या यासह आवश्यक सुविधा व इतर मागण्यांबाबत चर्चा होऊन महिनाभरात सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे संघटनेच्या नेत्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.