आधी दादागिरी नंतर दिलगिरी
नवी मुंबई: सिवूड परिसरात मनपा स्थापत्य विभागाकडून काम सुरू आहे. मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे असून नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी भूमिपुत्र असलेल्या अभियंत्याला शिवीगाळ करत धमकी दिली. याचा निषेध म्हणून भूमिपुत्र ठेकेदार आक्रमक झाले व गजानन काळे यांच्या कार्यालयाला घेराव घालून जाब विचारला. त्यानंतर काळे यांनी दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी मागितली.
बुधवार ७ फेब्रुवारी रोजी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सीवूड येथे कंत्राटदाराने पर्यावरणाचे नियम पाळले नाहीत म्हणून पालिका अधिकाऱ्यांना बेभान शिवीगाळ, मारहाण करण्याची धमकी देत मोठा गोंधळ घातला. यावेळी एका भूमिपुत्र अभियंत्याला देखील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण तसेच उठाबश्या काढायची धमकी दिली होती. या प्रकरणामुळे स्थानिक भूमिपुत्र कंत्राटदारांनी नवी मुंबई मनसेची ही दादागिरी मोडून काढत त्यांना चांगलाच इंगा दाखवला.
भूमिपुत्र कंत्राटदारांनी आक्रमक भूमिका घेत मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात धडक देत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बुधवारी रुबाब दाखवणाऱ्या शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी मागितली. या प्रकारानंतर भूमिपुत्र कंत्राटदारांनी गजानन काळे यांच्यावर मनपातर्फे गुन्हा दाखल करावा म्हणून शहर अभियंता संजय देसाई यांची भेट घेऊन मागणी केली.
नवी मुंबई शहर हे भूमिपुत्रांच्या त्यागावर वसले आहे. आम्ही येथे मेहनत करून पोट भरत आहोत. मात्र गजानन काळेसारख्या व्यक्ती दादागिरी करून प्रदर्शन मांडत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे गजानन काळे यांच्या वाढत्या दादागिरीबाबत आम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रथमतः निवेदन देऊ. त्यानंतर असा प्रकार जर पुन्हा केला तर आम्ही देखील आगरी कोळी स्टाईलने इंगा दाखवू, असा इशारा ठेकेदार जितेश म्हात्रे यांनी दिला.