टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने तपासणीचा राबवणार उपक्रम
बदलापूर : कॅन्सरसारख्या आजाराचे वेळीच निदान झाल्यास पुढील उपचार घेऊन त्यावर मात करता येते. परंतु कुटुंबाच्या जबाबदारीत महिला आरोग्याच्या समस्यांकडे काहीसे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांना कॅन्सरपासून दूर ठेवण्यासाठी टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने बदलापूरसह मुरबाड विधानसभा मतदारसंघात उपक्रम राबविण्याचा मानस आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला.
फेरीवाल्यासाठी अजय राजा हॉल ते कात्रप पूलापर्यंत बांधण्यात येणाऱ्या मंडईच्या कामाचे जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीचे औचित्य साधून भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी आमदार कथोरे बोलत होते.
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महिलांची कॅन्सर तपासणी करण्यासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयाबरोबर करार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत महिला रुग्णांची कॅन्सर तपासणी करण्यासाठी टाटा रुग्णालय मशिन उपलब्ध करून देणार आहे. या मशिनद्वारे महिला रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी महिला डॉक्टरही उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सहकार्य करण्याची तयारी मुंबईच्या रोटरी क्लबने दाखवली आहे. त्यामुळे महिलांना कॅन्सरची तपासणी करण्यासाठी टाटा रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. शहरातच ही तपासणी होणार असल्याचे आमदार कथोरे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या कामाला वेग देण्यात येणार असून याबाबत जनजागृती करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार कथोरे यांनी केले. महिलांनी आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, किरण भोईर, निशा घोरपडे आदींसह शिवसेना व भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.