मीरा-भाईंदर महापालिकेची २४१ कोटींची विक्रमी कर वसुली

भाईंदर: 31 मार्च 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मीरा-भाईंदर महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत 241 कोटी 59 लाखांची विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे.

मालमत्ता कर वसुलीचा वेग हा आणखी जास्त प्रमाणात वाढवण्यात यावा यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सततच्या मालमत्ता कर विभाग आढावा बैठकीनुसार शहरातील मालमत्ता कराचा सतत पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शहरामधील बऱ्याचशा मालमत्ता धारकांकडे वर्षानुवर्षे थकबाकी असल्याने अशा वर्षानुवर्षे थकित असलेल्या मालमत्तांच्या बाबतीत महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सदर मालमत्ता जप्त करण्यात याव्यात व त्यावर महानगरपालिकेचे नाव चढवून अश्या मालमत्ता जाहीर लिलावद्वारे विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

याबाबत सतत शहरातील नागरिकांमध्ये विशेष जनजागृती देखील करण्यात आली होती. सदर कारवाईस सुरुवात होताच व जनजागृती केल्या कारणाने शहरातील मालमत्ता धारकांनी कर भरणा करण्यास सुरुवात केली. सदर कारवाईचे परिणाम म्हणून 31 मार्च 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मालमत्ता कर विभागामार्फत 241 कोटीची विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे. 241 कोटी मालमत्ता कर वसुली करण्याचे श्रेय मा. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (कर विभाग), नियंत्रण अधिकारी, सहाय्यक नियंत्रण अधिकारी, मालमत्ता कर विभागप्रमुख, सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपिक व कर्मचारी यांना दिले आहे. मागील वर्षी 31 मार्च 2024 रोजी 193 कोटी इतकी कर वसुली करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची मालमत्ता कर वसुली ही उत्कृष्टरित्या व वेगाने झाली असून 48 कोटी इतकी अधिक वसुली करण्यात आली आहे.

ऑनलाईन पद्धतीवर विशेष भर देत एक लाख 40 हजार नागरिकांनी तर रोख रक्कम आणि धनादेशद्वारे एक लाख 59,560 नागरिकांनी कर भरणा करून महापालिकेस सहकार्य केले आहे. महापालिकेच्या कोषाग्रहामध्ये एकूण मालमत्ता कर 241,59,98,932 रुपये इतका जमा करण्यात आलेला आहे. तसेच, महत्वपूर्ण बाब म्हणजे आठ कोटी 98 लाख 39,365 रकमेचे 385 धनादेश हे बँक खात्यात जमा करण्यात आले असून बँकेच्या मंजुरीकरिता प्रलंबित आहेत. आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतची सर्वात जास्त मालमत्ता कराची विक्रमी वसुली 241 कोटी इतकी करण्यात आली.