आज यूपी वॉरियर्स पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. कालच त्यांनी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळला असून, विश्रांतीसाठी फारसा वेळ न मिळताच मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघ याच मैदानावर आत्मविश्वासाने भरलेल्या मुंबई इंडियन्सशी दोन हात करणार आहे. मागील सामन्याप्रमाणेच, महापालिका निवडणुकांमुळे हा सामना देखील प्रेक्षकांविना खेळवला जाणार आहे.
दोन्ही संघांच्या सध्याच्या फॉर्ममधील तफावत स्पष्टपणे जाणवते. WPL 2026 मध्ये यूपी वॉरियर्स अजूनही आपला खेळ सावरताना दिसत असताना, मुंबई इंडियन्सने मात्र योग्य लय पकडली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध पहिल्याच सामन्यात अत्यंत अटीतटीच्या पराभवानंतर, गतविजेत्या मुंबईने दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय मिळवत जोरदार पुनरागमन केले. विशेष म्हणजे, धावांचा पाठलाग असो वा बचाव, दोन्ही परिस्थितींमध्ये मुंबई संघ तितकाच प्रभावी ठरला आहे.
या यशाच्या केंद्रस्थानी आहे कर्णधार हरमनप्रीत कौर. सलग दोन अर्धशतके झळकावत तिने दोन्ही सामन्यांत ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा मान पटकावला असून, संघाला आत्मविश्वास आणि स्थैर्य दिले आहे. काही प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे मुंबईला अडचणींचा सामना करावा लागला असला तरी, संघाने त्या अडथळ्यांवर मात केली आहे. हेली मॅथ्यूज पहिल्या दोन सामन्यांना मुकली, तर नॅटली सिव्हर-ब्रंट तिसऱ्या सामन्यात उपलब्ध नव्हती. मात्र अशा परिस्थितीतही इतर खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारत संघाला पुढे नेले.
यातील सर्वात आनंददायी बाब ठरली आहे ऑस्ट्रेलियन अष्टपैलू निकोला कॅरीची कामगिरी. 32व्या वर्षी WPL मध्ये पदार्पण करणाऱ्या कॅरीने महत्त्वाच्या क्षणी विकेट्स घेण्याची क्षमता आणि मधल्या फळीत केलेल्या मोलाच्या योगदानामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मुंबईच्या संघनिवडीत पेच निर्माण झाला आहे. मागील हंगामात जेव्हा मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले होते, तेव्हा अमीलिया कर, हेली मॅथ्यूज, नॅटली सिव्हर-ब्रंट आणि शबनिम इस्माईल हे चार परदेशी खेळाडू संघात ठामपणे असायचे. जर सिव्हर-ब्रंट यूपी वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यासाठी तंदुरुस्त झाली, तर मग कोणाला बाहेर बसावे लागेल, हा प्रश्न उभा राहतो. सध्याच्या फॉर्मवरून पाहता, कॅरीला वगळणे अन्यायकारक ठरेल कारण या मोसमात तिने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे.
मुंबईप्रमाणेच यूपी वॉरियर्सचाही कणा त्यांचे परदेशी खेळाडू आहेत. WPL 2025 मध्ये गुणतालिकेच्या तळाशी राहिल्यानंतर, यंदा परिस्थिती बदलण्यासाठी कर्णधार मेग लॅनिंगला फीबी लिचफिल्ड, डिआंड्रा डॉटिन आणि सोफी एक्लस्टन यांच्याकडून एकत्रित कामगिरीची अपेक्षा असेल.
याशिवाय, दीप्ती शर्मा आणि एक्लस्टन ही फिरकीपटूंची जोडी यूपी वॉरियर्ससाठी मोठी ताकद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडलेल्या या दोघींचे आठ षटके सामन्याचा निकाल ठरवू शकतात. मधल्या षटकांत त्यांनी सातत्याने दबाव निर्माण केला, तर मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश लावण्यात यशस्वी होतील.
मात्र, दोन वेळा विजेतेपद पटकावलेल्या आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात करणे सोपे नाही. यूपी वॉरियर्ससाठी यश केवळ वैयक्तिक कामगिरीवर नाही, तर लॅनिंगच्या रणनीतीवरही अवलंबून असेल. गोलंदाजांचा योग्य वापर आणि दबावाच्या क्षणी खेळाडूंमधून सर्वोत्तम कामगिरी काढून घेणे, हे निर्णायक ठरणार आहे.
हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्स आपली विजयमालिका कायम ठेवून गुणतालिकेत पकड मजबूत करू पाहतील, तर यूपी वॉरियर्स योग्य संयोजन शोधून अखेर आपल्या क्षमतेचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी उत्सुक असतील. स्पर्धेतील सर्वात ताकदवान संघाविरुद्ध हे कोडे ते सोडवू शकतात का, याची उत्सुकता निश्चितच असेल.
आमने-सामने (मागील 5 सामने)
मुंबई इंडियन्स – 4 | यूपी वॉरियर्स – 1
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 15 जानेवारी 2026
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमी, नवी मुंबई
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार