मुंबई इंडियन्स यूपी वॉरियर्सशी आपला हिशेब चुकवण्यासाठी सज्ज

आज वुमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 चा मुंबई टप्पा संपन्न होत आहे. सोमवारपासून या स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा टप्पा वडोदरामध्ये खेळवली जाईल.

नवी मुंबईमधील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये दोन रोमांचक सामने मुख्य आकर्षण ठरतील. पहिल्या सामन्यात सध्या विजेतेपद राखणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सामना यूपी वॉरियर्सशी होणार आहे, ज्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईला सात विकेट्सनी पराभूत करून जोरदार पुनरागमन केले आहे. फक्त 48 तासांपेक्षा कमी वेळात दोन्ही संघ पुन्हा मैदानात उतरतील आणि या सामन्यात वर्चस्व मिळवण्यासाठी उत्सुक असतील.

तीन सलग पराभवानंतर आपली लय गमावल्यानंतर, यूपी वॉरियर्सना अखेर मुंबई इंडियन्सविरुद्ध आपली ताकद सिद्ध करण्याची संधी मिळाली. 162 धावांचा लक्ष्य त्यांच्यासमोर होता. हरलीन देओलच्या चमकदार कामगिरीमुळे संघाने सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर, जिथे देओलला 47 धावा करून 36 चेंडूंवर रिटायर आउट करण्याचा वादग्रस्त निर्णय उलटा पडला, त्या अपयशानंतर हा विजय संघासाठी आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यास महत्त्वाचा ठरला. चंदीगडची 27 वर्षांची हरलीन देओल, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, 39 चेंडूंवर 64 धावांची नाबाद, शांत आणि प्रभावी खेळी खेळून केवळ संघाला हंगामातील पहिला विजय देत नाही तर तिच्या कौशल्याची जाणीव संघ व्यवस्थापनेला करून दिली.

मात्र यूपी वॉरियर्सचे इतर फलंदाज तितके प्रभावी ठरलेली नाहीत. कर्णधार मेग लॅनिंग आणि सोलापूरची किरण नवगिरे यांच्या सलामी जोडीने अजूनही चमक दाखवलेली नाही, ज्यामुळे मधल्या क्रमांकावरील फलंदाजांवर दबाव येतो. आठ पैकी चार साखळी सामने खेळल्यानंतरही सलामी जोडी संघर्ष करतीय. संघात फीबी लिचफिल्ड सारखी क्षमता असली तरी, प्रत्येक सामन्यात तिच्याकडून मोठ्या योगदानाची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

गोलंदाजी विभागात, वॉरियर्सची ताकद त्यांचे फिरकीपटू आहेत. दीपती शर्मा आणि सोफी एकलस्टन यांचे प्रदर्शन सामन्याचा सामन्याचा निकाल ठरवू शकतो. मागील सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांची कामगिरी लक्षात घेता, पुन्हा त्यांचे आठ षटके महत्वाचे ठरतील.

मुंबई इंडियन्स, दुसरीकडे, अलीकडील पराभवातून धडे घेऊन दुपारी होणाऱ्या सामन्यात सुधारणा करण्यासाठी उत्सुक असतील. वॉरियर्सप्रमाणे, त्यांची सलामी जोडीही स्थिर नाही, चार सामन्यात तीन वेगवेगळ्या सलामी जोडी वापरल्या गेल्या आहेत. यष्टीरक्षक-फलंदाज गुणलन कमलिनीसोबत अमिलिया कर, हेली मॅथ्यूज आणि अमनजोत कौर यांनी सलामी केली आहे. मात्र नॅटली सिव्हर ब्रन्ट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर सारख्या अनुभवी खेळाडूंसह, संघाला कोणत्याही परिस्थितीत सामन्याचा परिणाम बदलण्याची ताकद आहे. निकोला कॅरीची अष्टपैलू कामगिरी ही देखील एक महत्वाची बाब ठरू शकते.

मुंबई इंडियन्सने दोन पराभवांच्या दरम्यान दोन विजय देखील नोंदवले आहेत. यंदाच्या हंगामात वॉरियर्सकडून आधीच पराभूत झाल्यानंतर, आजच्या सामन्यात ते हिशेब चुकवण्यासाठी सज्ज असतील.

तसेच, संध्याकाळच्या सामन्यात, दोन जिवलग मैत्रिणी स्मृती मानधना (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) आणि जेमिमा रॉड्रिग्स (दिल्ली कॅपिटल्स) आमने-सामने येतील.

 

आमने-सामने (मागील 5 सामने)
मुंबई इंडियन्स – 3 | यूपी वॉरियर्स – 2

 

सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 17 जानेवारी 2026
वेळ: दुपारी 3 वाजता
स्थळ: डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमी, नवी मुंबई
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार