मेट्रो, पूल, रस्त्यांना गती; ठाणे होणार वेगवान!

एमएमआरडीएकडून आठ हजार कोटींची तरतूद

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात सुमारे आठ हजार कोटींहून अधिक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यात उड्डाणपूल, कोस्टल रोड, मेट्रो, सागरी वाहतूक आदी प्रकल्पांचा समावेश असल्याने येत्या काळात ठाणे शहर वेगवान होण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडी कमी करणे, उपनगरांमधील दळणवळण सुलभ करणे आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन कोस्टल रोड, मेट्रो, उड्डाणपूल आणि सागरी वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्याला झुकते माप देण्यात आले असून हे प्रकल्प मार्गी लागल्यास भविष्यात ठाणे वेगवान होणार आहे.

ठाणे कोस्टल रोडसाठी सुमारे १,०२९.५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बाळकुम ते गायमुख या पट्ट्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. तसेच ठाणे ते बोरिवली दरम्यानच्या बोगदा प्रकल्पासाठी सुमारे ३,०२३.२० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असून, यामुळे ठाणे-पश्चिम उपनगरांतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

रस्ते व उड्डाणपूल प्रकल्पांनाही चालना देण्यात आली आहे. आनंदनगर ते साकेत उन्नत मार्गासाठी ८८०.१२ कोटी, ठाणे कोस्टल (बाळकुम–गायमुख) मार्गासाठी सुमारे १०२५.७७ कोटी रुपयांची तरतूद आहे. काटई नाका येथे उन्नत मार्गासाठी सुमारे ९०० कोटी, साकेत-आमणे समृद्धी मार्ग-५०० कोटी, ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग-३,०२३.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोलशेत-काल्हेर-भिवंडी जोडणारा पूल तसेच कल्याण खाडी परिसरातील समांतर रस्ते प्रकल्पांमुळे ठाणे, भिवंडी आणि कल्याण परिसरातील दळणवळण अधिक सक्षम होणार आहे.

मेट्रो- ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गासाठी सुमारे ३६३०.७१ कोटी रुपयांची तरतूद आहे. मेट्रो-५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) मार्गासाठी सुमारे १३०९.३० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच मेट्रो १० (गायमुख-मिरा रोड) प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

औद्योगिक व नवविकास प्रकल्प
रायगड-पेण तसेच खारबाव इंटिग्रेटेड बिझनेस पार्कसारख्या नवविकास प्रकल्पांचाही आराखड्यात समावेश आहे. यामुळे ठाणे आणि लगतच्या भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
एकूणच, एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पातून ठाणे जिल्ह्याला रस्ते, मेट्रो आणि सागरी मार्गांच्या माध्यमातून मोठा पायाभूत विकासाचा वेग मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवासाचा वेळ घटवणे आणि आर्थिक क्रियाशीलता वाढवणे या तिन्ही उद्दिष्टांसाठी ठाणे आता ‘विकास हब’ म्हणून पुढे येण्याची चिन्हे दिसत आहेत.