ठाणे : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग येत्या रविवारी ११ फेब्रुवारी २४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक करणार आहे.
माटुंगा-ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत मेगा ब्लॉक असेल.
छशिमट मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.०९ या वेळेत सुटणा-या डाउन धीम्या सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. पुढे ठाणे स्थानकावर धिम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
कल्याणहून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत अप धीम्या सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
छशिमट /दादरहून सुटणा-या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार/ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील आणि दादर/ छशिमट येथे येणा-या अप मेल/एक्सप्रेस गाड्या या ब्लॉकदरम्यान कल्याण आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
डाउन धिम्या मार्गावर, ब्लॉकपूवीर्ची शेवटची लोकल छशिमट येथून सकाळी ९.५३ वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छशिमटहून ३.१८ वाजता सुटेल. अप धिम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याणहून सकाळी ९.५५ वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल दुपारी ३.२४ वाजता सुटेल.
सकाळी ११ ते ५ या दरम्यान छशिमटहून सुटणा-या/पोहोचणा-या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
(बेलापूर-उरण आणि नेरुळ-उरण सेवा प्रभावित नाही, नेरुळ/बेलापूर-उरण पोर्ट मार्ग वगळून)
पनवेलहून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छशिमट मुंबई येथे जाणारी अप हार्बर सेवा आणि छशिमट येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२पर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेलहून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि ठाण्याहून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन सेवा बंद राहतील.
डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाण्याहून सकाळी ९.३९ वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल दुपारी ४ वाजता असेल आणि पनवेलला दुपारी ०४.५२ वाजता पोहोचेल.
अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाण्याला जाणारी शेवटची लोकल पनवेलहून सकाळी १०.४१ वाजता सुटेल आणि ठाण्याला सकाळी ११.३३ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेलहून ४.२६ वाजता सुटेल आणि ठाण्याला संध्याकाळी ५.२० वाजता पोहोचेल. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा आणि बेलापूर/नेरुळ व उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.