सुपर स्वच्छ लीगमध्ये नवी मुंबई महाराष्ट्रात एकमेव
नवी दिल्ली: स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात मिरा भाईंदर महानगरपालिकेने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण नगर विकास मंत्री मनोहर लाल आणि राज्यमंत्री तोखन साहू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रधान सचिव नगरविकास विभाग-2 डॉ. के.एच. गोविंदराज, राज्य मिशन डायरेक्टर स्वच्छ महाराष्ट्र शहरी नवनाथ वाठ उपस्थित होते.
स्वच्छ शहरांच्या मूल्यांकनामध्ये ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर महानगरपालिकेने 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार राज्यमंत्री यांच्यासह महापालिकेचे आयुक्त राधा बीनोद शर्मा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह स्वीकारले. मीरा-भाईंदरने अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली, मशीनद्वारे कचरा संकलन आणि नागरिकांमध्ये जनजागृती घडवून हे यश संपादन केले.
10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गटात नवी मुंबई महानगरपालिकेने “सुपर स्वच्छ लीग सिटी” पुरस्कार पटकावला आहे पुरस्कार राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ करिता गुणांकन पध्दती बदललेली असून ‘सुपर स्वच्छ लीग’ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली आहे. स्वच्छतेत नेहमीच अग्रभागी असणा-या शहरांऐवजी इतरही शहरांना क्रमवारीत पुढे येण्याची संधी मिळावी यादृष्टीने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ पर्यंत जी शहरे लागोपाठ तीन वर्षे किमान दोन वेळा टॉप थ्रीमध्ये आहेत अशा शहरांसाठी ‘सुपर स्वच्छ लीग’ ही क्रमवारीपेक्षा उच्च अशी विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला सुपर स्वच्छ मानांकन झालेले आहे. त्यामुळे नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका अक्षय फडकत ठेवली आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट झालेल्या देशातील मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. यासोबतच कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ‘सेव्हन स्टार मानांकन’ तसेच ओडीएक कॅटेगरीमध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ मानांकन नवी मुंबईने कायम राखले आहे.