मुंब्रा बायपासवर पावणे दोन कोटींचे एमडी जप्त

ठाणे: ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सर्व विभागांना आदेश देत कारवाईचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे गुन्हे शाखा घटक १च्या पथकाने एका एमडी तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून एक कोटी ६९ लाखांचा एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

ठाणे गुन्हे शाखेला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की मुंब्रा बायपास मार्गावर एक जण एमडी घेऊन जाणार आहे. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपासजवळ सापळा रचला. यावेळी पोलिसांना एक मारुती कार संशयास्पद फिरताना आढळली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी ही कार आणि चालक मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा याला ताब्यात घेत झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून पोलिसांना एक कोटी ६९ लाख रुपये किमतीचा एक किलो २०९ ग्राम एमडीचा साठा मिळाला.

पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून तस्कराला अटक केली आहे. त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तस्कराने एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी कुठून आणला आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणला होता. याचा तपास पोलिस करत आहेत.