मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे प्रतिपादन
भिवंडी: भाजप महायुती भिवंडीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. भाजप महायुतीचा महापौर दिला तर शहराचा चेहरा-मोहरा बदलू, तसेच शहराच्या विकासासाठी निधी कमी करणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी भिवंडीत झालेल्या प्रचार सभेत दिले.
भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज बुधवारी सायंकाळी ४ वाजता प्रचार सभा आयोजित केली होती. या प्रसंगी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौघुले व महायुतीचे सर्व उमेदवार व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणविस म्हणाले, भिवंडी हे ऐतिहासिक शहर आहे, पण दुर्दैवाने भिवंडी शहराचा विकास झालेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विविध समस्याना सामोरे जावे लागत आहे. या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर भिवंडीकरांना एक नवीन इतिहास घडवावा लागेल. त्यासाठी भिवंडीमध्ये महायुतीचा महापौर बसवावा लागेल. निवडणुकीच्या सुरुवातीला भिवंडीकरांनी षटकार मारला आहे. सहा नगरसेवक बिनविरोध निवडून दिलेले आहेत. ही आनंदाची बाब आहे. ते पाहता इतर पक्षांची अवस्था अत्यंत बिकट आहे. या ठिकाणी समाजवादी पार्टीचे जे आमदार आहेत ते इतर पक्षाच्या उमेदवारांना तिकीट वाटून प्रचार करीत आहेत. ते काय भिवंडीचा विकास करणार? निवडणुकीत उभे राहिलेले इतर उमेदवार भिवंडीच्या विकासाकरता निवडणूक लढवित नाही. त्यांच्याकरिता भिवंडी महापालिका एक एटीएम आहे. त्यामधून त्यांना रोज पैसा कमावता येतो. म्हणून त्यांना भिवंडी पालिकेची सत्ता पाहिजे आहे. मात्र भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीला भिवंडीमध्ये एक चांगले परिवर्तन घडवायचे आहे. एक चांगले शहर तयार करायचे आहे, असेही श्री. फडणविस यांनी स्पष्ट केले.
आजतागायत भिवंडी महापालिकेची सत्ता कोणाकडे आहे, हे महायुती सरकारने न पाहता शहराच्या विकासाकरीता कधी निधी कमी पडू दिला नाही, याची माहिती सर्वांना आहे. त्या माध्यमातून भाजप महायुतीने शहरात आरसीसी रस्ते, भुयारी गटारे, मेट्रो रेल्वे आदी विविध सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे सुरु करण्याचे काम पूर्णत्वाकडे नेत असून पहिला टप्पा हा २०२७ मध्ये सुरू होणार आहे. मेट्रो प्रकल्प सुरु करण्याकरिता आलेल्या अनेक अडीअडचणी दूर करून भिवंडीमध्ये मेट्रो ही अंडरग्राउंड करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भिवंडीतील वाहतूक कोंडी दूर करून शहरातील दळणवळण सुरळीत करण्याच्या हेतूने नवीन इंफ्रास्ट्रक्चर तयार करणार आहे. त्यासाठी आवश्यकता पडल्यास जुने उड्डाणपूल तोडून त्या ठिकाणी मोठे चार पदरी उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे, असे सांगून भिवंडीला दिलेल्या विविध सुविधांचा पाढा मुख्यमंत्री फडणविस यांनी आपल्या भाषणात वाचला.
भिवंडी हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईचे सगळं लॉजिस्टिक आहे. त्याला मोठे लॉजिस्टिक हब बनवायचे आहे. तसेच भिवंडी हा एक चांगला लॉजिस्टिक हब तयार करून त्याचा योग्य व नियोजित पद्धतीने विकास करून अनेकांच्या हाताला काम मिळेल व लोकांना व्यवसाय करता येणार आहे, याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, असा अपप्रचार विरोधक करीत आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका. लाडकी बहीण योजना देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत सुरु राहणार आहे. तर लाडक्या बहिणीला लखपती दीदी बनवायचे आहे. यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे, असे आश्वासन उपस्थित बहिणींना मुख्यमंत्र्यांनी दिले.