ठाण्यात जनसुरक्षा कायद्याला ‘मविआ’चा कडाडून विरोध

ठाणे: भाजप सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा जनविरोधी, घटनाविरोधी आणि लोकशाही हक्क नाकारणारा असून तो रद्द करावा, अशी मागणी करत आज ठाण्यात महाविकास आघाडी आणि इतर संघटनांनी जोरदार निदर्शने केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखा तसेच भारत जोडो जन सुरक्षा विरोधी संघर्ष समिती ठाणे जिल्हा त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष सामाजिक आणि पुरोगामी जन संघटना यांनी आज कडाडून विरोध केला. जन सुरक्षा विधेयक हुकूमशाही पद्धतीने असून सरकार विरोधात आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा वापर केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कायद्याची सध्या गरज नसताना सरकारने मोठ्या उद्योजकांसाठी केलेला कायदा असल्याचा आरोप आंदोनकर्त्यांनी केला.

यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, संपर्कप्रमुख नरेश मणेरा,
भारत जोडो ठाणे जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र चव्हाण, विशाल जाधव, नारी अत्याचार विरोधी मंचाच्या मुक्ता श्रीवास्तव, शोषित जन आंदोलन समितीचे इंदवी तुळपुळे, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उदय चौधरी, भारतीय महिला फेडरेशनच्या निर्मला पवार, विद्युत कर्मचारी संघ निलेश्वर बनसोडे, राष्ट्र सेवा दलाचे सुहास पोते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे अध्यक्ष सुहास देसाई, ठाकरे गटाचे रोहिदास मुंडे, केदार दिघे, रेखा खोपकर, पुष्पलता भानुषाली, संजय तरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.