रेल्वेमधील हत्याकांड धार्मिक द्वेषातून-आ.जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मूक निदर्शने

ठाणे: जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये केवळ धार्मिक आणि जातीय द्वेषातून चार जणांची हत्या एका आरपीएफ जवानाने केली. या हत्याकांडातून बुद्ध-गांधींच्याच्या देशात आता दुहीची बिजे रोवली जात आहेत, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भर पावसात मूक निदर्शने केली.

सोमवारी जयपूरहून निघालेल्या रेल्वेगाडीत आरपीएफचा जवानाने आपले वरिष्ठ अधिकारी मीना यांच्यासह चार जणांवर गोळीबार केला. त्यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर मृतदेहाजवळ उभे राहून त्याने धर्मांधतेचे भाष्य केले. केवळ धार्मिक द्वेषातून त्याने चारजणांचे जीव घेतले असल्याने या विद्वेष पसरविणार्‍या प्रवृत्तींविरोधात हे आंदोलन करण्यात आले, असे श्री.आव्हाड यांनी सांगितले.

या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, सध्या देशामध्ये धर्मांधता दिसून येत आहे. काल एका आरपीएफ जवानाने गोळीबार करून चारजणांचे जीव घेतले. या घटनेतून आपण काय पेरलं आणि काय उगवलं, हे बघण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने महात्मा गांधींना मारले तेव्हा नथुरामाचे हात थरथरले नव्हते. आता असे अनेक नथुराम जन्माला येत आहेत. त्यांचेही हात थरथरत नाहीत. या देशात मुहमे राम आणि पेट मे नथुराम अशी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. म्हणूनच मणीपूरमध्ये भगिनींना विवस्त्र फिरवण्यात आले. ही माणुसकी नाही. आता ट्रेनमध्ये जे झाले ते भयानक आहे. त्या जवानाने माणसे शोधून शोधून मारली. आता पोलीस सारवासारव करीत आहेत की तो वेडा आहे, आजारी आहे. मग, जर तो वेडा , आजारी होता. तर त्याच्या हातात बंदूक का दिली? आपल्याकडे होत असलेली राजकीय घसरणच धर्मांधता वाढवत आहे. देशात गांधींचे विचार, संविधान पायदळी तुडवले जात आहेत. म्हणूनच संविधानकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायाशी शांततेत बसून जे पोरके झालेत त्यांना बोलके करण्याचा प्रयत्न केला आहे.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शानु पठाण, विक्रम खामकर, सुजाता घाग, परिवहन सदस्य शमीम खान, राजू चापले, प्रियांका सोनार, प्रफुल्ल कांबळे, मधुर राव, अंकुश मढवी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.