पदार्पणालाच क गटात मार्श संघ अजिंक्य

* ११० धावांनी ॲप्लाईड क्लाउड संघाचा दणदणीत पराभव
* ठाणेवैभव आंतरकार्यालयीन करंडक

ठाणे: ठाणेवैभव करंडक स्पर्धेत प्रथमच पदार्पण केलेल्या मार्श संघाने ॲप्लाईड क्लाउड कॉम्प्युटिंग संघाचा ११० धावांनी पराभव करत क गटात ठाणेवैभव करंडकावर नाव कोरले.

दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे क गटात अंतिम सामना मार्श आणि ॲप्लाईड क्लाउड कॉम्प्युटिंग संघात झाला. मार्शने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. मात्र आघाडीवर अजिंक्य पाटील शून्यावर बाद झाला. त्यानंतर प्रदीप शर्मा ३८, चिन्मय कदम ३७ आणि हर्ष मिश्रा २२ यांची कामगिरी वगळता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र अवांतर २७ धावा आणि ३२ पेनल्टी धावा असा एकूण ५९ धावांचा बोनस ॲप्लाईड क्लाउड कॉम्प्युटिंग संघाने दिल्याने मार्श संघाला आठ गड्यांच्या बदल्यात १९९ धावांचे आव्हान उभे करता आले. ॲप्लाईड क्लाउड कॉम्प्युटिंग संघाच्या अजिंक्य पवार याने सात षटकांत फक्त १३ धावा देत तीन गडी बाद केले.

मार्शच्या आव्हानाचा पाठलाग करताना ॲप्लाईड क्लाउड कॉम्प्युटिंग संघ संपशेल अपयशी ठरला. आघाडीला उतरलेला सुनीत शर्मा शून्यावर बाद झाला. संघातील तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. वैभव मुजागे १५ आणि हृतिक परब याच्या १९ धावा वगळता एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. अवघ्या ८९ धावांत ॲप्लाईड क्लाउड कॉम्प्युटिंग संघ तंबूत परतला. मार्शच्या शिवप्रकाश जैस्वाल याने सर्वाधिक तीन गडी बाद करत सामनावीराचा ‘किताब पटकावला.

मार्शने पदार्पणालाच किरण देसाई यांच्या नेतृत्वाखाली ठाणेवैभव करंडकावर नाव कोरले.