‘कलर्स मराठी’ वरील लोकप्रिय जोडी रमा राघवचा लग्न सप्ताह जोरदार रंगला असून चुडा,मेंदी,संगीत, हळद या कार्यक्रमांनी उतरोत्तर रंगलेल्या या सोहळ्याचा परमोच्च बिंदु म्हणजेच मराठमोळा साज असलेला लग्न सोहळा येत्या रविवारी १७ मार्चला दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता रंगणार आहे.
गेले कित्येक महिने सोशल मिडियावर सातत्याने ज्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती ते रमा राघवचे बहुप्रतीक्षित विधिवत लग्न पेशवाई थाटात आणि दोन्ही कुटुंबांच्या जल्लोषात थाटामाटात रंगणार आहे. अलीकडे दुर्मिळ होत चाललेले सगळे मराठमोळे लग्नविधी या सोहळ्यात प्रेक्षकांना अनुभवता येतील. वडीलधाऱ्यांच्या साक्षीने आपले पुन्हा लग्न व्हावे ही रमाराघवची आणि पर्यायाने प्रेक्षकांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण होणार आहे. आजवर रमा राघवच्या आयुष्यात आलेली वादळे पाहता, हे लग्न निर्विघ्न पार पडावे ही रमा राघवची आणि प्रेक्षकांची मनोमन इच्छा आहे.
पुरोहित आणि परांजपे कुटुंबाचा हा एकत्रित लग्नसोहळा ज्या जल्लोषात लग्नसप्ताह पार पडला,त्याच उत्साहात धुमधडाक्यात साजरा होणार असून रमा राघवच्या आयुष्याच्या या नव्या सुरुवातीची प्रेक्षकांना विशेष आतुरता आहे
पेशवाई पेहराव आणि रमा राघव मंगळसूत्र
या मराठमोळ्या लग्नसोहळ्यात पेशवाई पेहराव हे वेगळेपण असून राघवचे राजबिंडे रूप आणि रमाचे खुलून आलेले खानदानी सौंदर्य विलोभनीय आहे. पारंपरिक पोशाख, दागिने यांनी सजलेल्या या सोहळ्यात रमाचे ‘रमाराघव’ मंगळसूत्र ही वेगळेपणामुळे चर्चेत आले आहे.