* प्रदूषणाने जैवसाखळी तुटली
* उपयुक्त खारफुटी संपली
* शहरासह जिल्ह्याला वादळ, पुराचा फटका बसण्याची भीती
ठाणे जिल्ह्याला २७ किमीचा खाडी किनारा लाभला असून या खाडीत १६ प्रकारची खारफुटी आढळते. मात्र आता या ठिकाणी ‘मारंडी’ या काटेरी प्रजातीची खारफुटी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून निसर्गाने ठाण्याला दिलेली ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा पर्यावरण अभ्यासकांनी दिला आहे.
एकेकाळी हिरवाईने बहरलेल्या खारफुटीच्या जंगलांवर आता प्रदूषणाची काळी छाया पसरू लागली आहे. ठाणे खाडीतील दलदलीत वाढणाऱ्या खारफुटीला पाण्यात मिसळणारे जड धातू, औद्योगिक सांडपाणी आणि मलमूत्र घातक ठरत आहे. यामुळे उपयुक्त खारफुटीची झाडं दगावू लागली असून त्या जागी ‘मारंडी’ या काटेरी प्रजातीचा प्रसार वाढत आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते मारंडीचा उदय म्हणजे खाडीतील प्रदूषणाचं जिवंत इंडिकेटरच आहे.
त्सुनामीनंतर जगाला खारफुटीचे महत्त्व उमगले. लाटांना परतवणे, किनाऱ्याचे संरक्षण करणे, माशांना व जलचरांना सुरक्षित आसरा देणे, पक्ष्यांना अधिवास उपलब्ध करून देणे आणि जैवविविधतेचा समतोल राखणे ही सगळी महत्त्वाची कामे खारफुटी करते. ठाणे खाडीकिनारी तीवर, कांदळ, सूरकांदळ, चिपी, सूड, मिरची अशा १५ ते १६ प्रकारच्या खारफुटी आढळतात. पण आज ही परिसंस्था संकटाच्या दाराशी पोहोचली आहे.
वरून पाहता खारफुटीची जंगलं दाट, गर्द दिसतात; पण आतल्या बाजूला चित्र अगदी वेगळं आहे. सांडपाणी, सल्फर, फॉस्फेट, लेडसारखे जड धातू खारफुटीच्या झाडांना पोखरत आहेत. झाडं दगावतात आणि मोकळ्या जागा निर्माण होतात. त्या ठिकाणी सूर्यकिरण पोहोचतात आणि हमखास “मारंडी” उगवते.
“जड धातूंनी खारफुटीचा जीव गुदमरतो. मृत झाडांची पोकळी मारंडी झपाट्याने व्यापते. हा निसर्गाचा धोक्याचा इशारा आहे. दुर्लक्ष केले तर खाडीचे भविष्य धोक्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रमोद साळसकर यांनी दिली.
मारंडीचं इंग्रजी नाव Sea Holly (Acanthus illisifolius) आहे. काटेरी पानं असलेली ही वनस्पती खारफुटी परिसंस्थेचा भाग असली तरी तिचा वेगवान प्रसार म्हणजे प्रदूषण वाढल्याचे चिन्ह आहे. पर्यावरण तज्ञ हेमंत कारखानीस म्हणतात, गर्द खारफुटीच्या जंगलात जिथे सूर्यप्रकाश सरळ दिसतो आणि झाडं विरळ दिसतात, तिथे मारंडी हमखास उगवते. म्हणजेच त्या भागातील खारफुटी प्रदूषणामुळे संपुष्टात आली आहे.”
ठाणे जिल्ह्याला २७ किमीचा खाडीकिनारा लाभला असला तरी भूमाफियांच्या अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणावर खारफुटीचा ऱ्हास झाला आहे. त्यातच दररोज खाडीत मिसळणारं औद्योगिक व घरगुती सांडपाणी परिस्थिती अधिकच भीषण बनवत आहे. महापालिकेने मलनिस्सारण प्रकल्प व खारफुटी रोपण मोहिमा हाती घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात प्रदूषण थांबलेलं नाही.
खारफुटी म्हणजे फक्त झाडं नाहीत – ती ठाण्याच्या किनाऱ्याचा कवच आहेत. जर ही कवचं नष्ट झाली, तर वादळं, त्सुनामी, पुर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका ठाणेकरांना बसणार आहे.
आज खाडीतील मारंडी वाढतेय म्हणजे धोक्यात धोक्याची सूचना आहे, असे डॉ.साळसकर म्हणाले.