मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमी रुग्णांना डिस्चार्ज
ठाणे: मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल आठवड्याभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. तर काही रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर आज त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आले.
सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून आम्ही बचावलो असल्याची प्रतिक्रिया जखमींना दिली. दरम्यान, घरी जाताना अनेक रुग्णांचे डोळे पाणावले असल्याचे पाहायला मिळाले.
मागील आठवड्यात मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये प्रवास करताना लोकलमधून १४ प्रवासी पडल्याची घटना घडली होती. यामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन गंभीर जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळवा रुग्णालयातील उपचार घेणारे पाच रुग्ण हे बरे होऊन घरी पाठविण्यात आले असुन अन्य दोन रुग्णांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अशी माहिती कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी आज दिली.
अनिल मोरे (४०) आणि शिवा गवळी (२३) गंभीर जखमी झाल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मच्छिंद्र गोतारणे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला मुंबईच्या जेजे रुग्णालयात स्थलांतरित केले. उर्वरित कळवा रुग्णालयातील सात जखमींवर उपचार सुरु होते. यात कळवा रुग्णालयाने तीन रुग्णांवर अस्थिभंगची शस्त्रक्रिया करण्यात आली. तर दोन रुग्णांना तूर्तास शस्त्रक्रियेची गरज नसल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉ. बारोट यांनी दिली. कळवा रुग्णालयातून पाच रुग्णांना डिस्चार्ज दिला असून दोन रुग्णांना लवकरच घरी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचे जबाब रेल्वे पोलिसांनी नोंदविल्याचे सांगितले.
दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान धावत्या गाडीतून खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेच्या कारणांची चौकशी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने नागरिकांना आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे की, जर त्यांच्याकडे या घटनेविषयी किंवा त्यासंदर्भात कोणतीही माहिती, ज्ञान, तपशील असतील, तर कृपया चौकशी समितीसमोर लवकरात लवकर उपस्थित राहून माहिती द्यावी. किंवा वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी,एस.एस. सोनवणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे कार्यालय, मुंबई विभाग, मध्य रेल्वे,अॅनेक्स इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अथवा 8828119730 या मोबाईलवर किंवा srdsobbcr@gmail.com या ईमेल वर पाठवावे. माहितीसोबत ओळखपत्राची प्रत जोडण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.