मनोज जरांगे यांची पदयात्रा गुरुवारी नवी मुंबईत

नवी मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या उपोषणाला मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून २० जानेवारी रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत.

ही पदयात्रा गुरुवार २५ जानेवारी रोजी नवी मुंबई शहरात दाखल होणार आहे. यावेळी नवी मुंबई शहरात मोठ्या उत्साहात सदर आरक्षण दिंडीचे स्वागत केले जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजच्या वतीने सांगण्यात आले.

पदयात्रेच्या स्वागताच्या तयारीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या झालेल्या आढावा बैठक मागच्या आठवड्यात पार पडली. बैठकीला नवी मुंबई शहरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज जरांगे यांची पदयात्रा गुरुवारी दुपारी पनवेलमधे दाखल होईल. दुपारचे जेवण करून ही यात्रा कळंबोली, कामोठे, खारघर, बेलापूर, नेरुळ, जुईनगर, सानपाडा मार्गे एपीएमसी मार्केट वाशी, नवी मुंबई शहरात मुक्कामासाठी दाखल होईल.

पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा स्वयंसेवक हजारोंच्या संख्येने मदत करणार आहेत. वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ दिला जाणार नाही. आंदोलकांना जेवण, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आरोग्याविषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आरोग्य मदत केंद्र उभारली जाणार आहेत यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची ही मदत घेतली जाणार आहे. पनवेलमधून नवी मुंबई शहरात प्रवेश करताना पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे उभारून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.