ठेकेदार-अधिकाऱ्यांच्या हेराफेरीला बसणार लगाम

१० लाखांवरील कामांचेही होणार ऑडिट

ठाणे: दहा लाखापेक्षा जास्त खर्चाच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्यामुळे बोगस, कमी दर्जाचे, आणि कामे न करता बिल काढणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी परिपत्रक काढून आमदार निधी, नगरसेवक निधी, मागासवर्गीय निधी, त्याचबरोबर शासनाच्या अनुदानातून होणाऱ्या दहा लाखापेक्षा जास्त खर्चाच्या सर्व कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. जोपर्यंत थर्ड पार्टी ऑडिट होत नाही, तोपर्यंत ठेकेदारांची देयके देण्यात येणार नाहीत, अशा सूचना केल्या आहेत.

महापालिका क्षेत्रात विविध नागरी सुविधांची कामे सुरू आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही ठेकेदार कामे न करताच बिले काढत होती, कामाचा दर्जा राखला जात नसल्याने वारंवार तीच तीच कामे करण्यात येत होती, तसेच अर्धवट काम करून पूर्ण बिल काढले जात असल्याचे महापालिका आयुक्त श्री. बांगर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शहरातील नागरी सुविधांच्या कामाचा दर्जा राखलाच पाहिजे असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. काम सुरू असताना कोणत्याही प्रकारची हेराफेरी होणार नाही याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन साईटवर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिका आयुक्त श्री. बांगर यांच्या या आदेशामुळे कमी दराची निविदा भरून कमी दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना चाप बसणार आहे. शहरातील कामे चांगल्या दर्जाची होतील, अशी अपेक्षा जागरूक ठाणेकरांनी व्यक्त केली आहे.