ठाणे महापालिकेने काढली नोटीस
ठाणे: ठाण्यात अनधिकृत बांधकामे उभी राहत असून बनावट कागदपत्रांच्या आधारे गोरगरीबांना ती स्वस्तात विकली जात आहेत. याबाबत सावध करण्यासाठी ठाणे महापालिकेने चक्क नोटीस काढली असून घर विकत घेण्याआधी पालिकेच्या शहर विकास विभागात येऊन खात्री करण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे पालिका क्षेत्रामध्ये शेकडो इमारतींची बांधकामे सुरू असून येथील घरांच्या किंमती कोट्यवधींच्या घरात पोहचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातही घर घेणे आवाक्याबाहेर जात आहे. त्यात मुंबईतील चाळीतून ठाण्यात घराचे स्वप्न घेऊन अनेकजण येत आहेत. पण त्यांची ही गरज ओळखून त्यांना फसवण्याचे उद्योग बेधडक सुरू आहेत.
ठाणे शहरासह कळवा, मुंब्रा, दिवा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. पालिका अधिकारी आणि विकासकांच्या भ्रष्ट युतीमुळे अनधिकृत बांधकामांना जोर आला आहे. पण उच्च न्यायालयाने याची दखल घेत सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्याचे आदेश पालिकेला दिल्याने आता धडाक्यात कारवाईला सुरुवात झाली आहे. या कारवाईत व्याप्त इमारतीही पाडल्या जात आहेत. त्यामुळे शेकडो संसार भरपावसात उघड्यावर आले आहेत. अशी वेळ भविष्यात ओढावू नये यासाठी ठाण्यात घर घेताना सतर्क राहण्याचा इशारा पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी सुचना जारी केली आहे. त्यानुसार बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत इमारती, बैठ्या चाळींमध्ये घरे विकली जात असल्याची कबुली पालिकेने दिली आहे. त्यामुळे या कागदपत्रांची पडताळणी ठाणे पालिका मुख्यालयातील शहरविकास विभागाकडून करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहर विकास विभागात यासाठी लवकच वेगळी व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती संबंधित अधिकार्यांनी दिली.