मुंबई – ‘सप्तश्रृंगी’ गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून, अनेक कुटुंबाचे आराध्यदैवत असलेल्या “सप्तश्रृंगी देवी”चे तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील “साडेतीन शक्तीपीठांपैकी एक” म्हणूनही प्रसिद्ध आहे. भारतीय उपखंडातील ५१ शक्तीपीठांपैकी हे मंदिर देखील एक आहे आणि हे असे स्थान आहे जिथे सतीच्या (भगवान शिवाची पत्नी) अंगांपैकी एक, तिचा उजवा हात खाली पडल्याची नोंद आहे. या देवीचा महिमा दर्शवणारा “माझी आई श्री सप्तश्रृंगी” चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी शेमारु मराठी बाणा या मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत आहे. शेमारु इंटरटेनमेंट लि. निर्मित या चित्रपटाचे सह-निर्माते निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन आहेत.
सप्तशृंगी देवीचे महात्म्य वर्णवणाऱ्या या चित्रपटात सप्तश्रृंगी देवीची निस्सीम भक्त असलेल्या महिलेची कथा गुंफण्यात आली आहे. एका गरीब कुटुंबातील मुलगी श्रीमंत घरची सून होते आणि इथूनच सुरू होते तिच्या संकटांची मालिका. आपल्या भक्ताच्या संकटाला धावून येणारी सप्तश्रृंगी देवी आणि तिची भावभक्ती याचा सुंदर मिलाफ यात दर्शवण्यात आला आहे. कथा,पटकथा आणि सवांद अभिजित पेंढारकार यांचे असून, दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केले आहे, ग्रामीण विषय हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईसह प्रत्यक्ष सप्तश्रृंगी गडावर देखील झाले आहे.
या सिनेमात नायिका म्हणून मधुरा जोशी पदार्पण करत आहे. यापूर्वी मधुराने अनेक मराठी हिंदी मालिका केल्या आहेत. चित्रपटात तिचा नायक विकास पाटील आहे. सप्तश्रृंगी देवीच्या भूमिकेत शलाका पवार यांनी रंग भरला आहे. संजय कुलकर्णी, मोहन खांबाटे, मनीषा चव्हाण, आरती गोळीवाले, धनंजय जामकर, गणेश सरकटे, वैशाली मानकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भाग्येश पाटील यांनी सिनेमाला संगीतसाज चढवला आहे.
२५ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता शेमारुमराठीबाणा वाहिनीवर सदर चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. सप्तश्रृंगी देवीच्या भक्तांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.