ठाण्यातील यशस्वीनींना महिला गौरव पुरस्कार

ठाणेवैभव आणि युवान ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त महिला गौरव सोहळा नुकताच पार पडला. ठाण्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, युवान ग्रुपचे संचालक स्वप्नील मराठे आणि ठाणेवैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या हस्ते पार पडला.

आयकर विभाग मुंबईच्या जॉईंट कमिशनर व्रंदा मतकरी, ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपआयुक्त मीनल पालांडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उल्का नातू, एम आर आर रुग्णालयाच्या वाईस प्रेसिडेंट डॉ. मनीषा पाठक, न्यू होरायजन स्कॉलर स्कुलच्या रिजनल डायरेक्टर डॉ. ज्योती नायर, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुप्रिया देशमुख, उद्योजिका स्वाती बेडेकर-खरे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कानोलकर यांनी केले. सरस्वती विद्यालय प्रसारक ट्रस्टच्या मुख्याध्यापिका मंजुषा बल्लाळ देखील याप्रसंगी उपस्थित होत्या.

डॉ. सुप्रिया देशमुख

सुप्रसिद्ध डर्माटॉलॉजिस्ट आणि एस्थेटिक क्लिनिकच्या संस्थापक डॉ. सुप्रिया देशमुख गेल्या ५ वर्षांपासून कापूरबावडी, ठाणे येथे वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहेत. डॉ. सुप्रिया यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे येथून एमडी शिक्षण पूर्ण केले. विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्वचेची काळजी कशी घ्यायची याबाबत लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्वचेच्या विविध समस्यांवर कोणत्या उपाययोजना कराव्यात हे सांगण्यासाठी त्यांना नियमितपणे टेलिव्हिजनवर मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते. रूग्णांना जागतिक दर्जाचे आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी डॉ.देशमुख त्यांच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी त्यांच्या क्लिनिकमध्ये सर्व नवीनतम आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत मशीन्स देखील आहेत. त्यांना नुकताच ‘नारी शक्ती सन्मान 2018’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. देशमुख यांनी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे तर त्यांना स्वयंपाकाचीही आवड आहे.

मीनल पालांडे

श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त विजेत्या ठाणे महानगरपालिका क्रीडा विभागाच्या उपआयुक्त मीनल संजय पालांडे यांनी होतकरू मित्रमंडळ या त्यांच्या वैयक्तिक संघाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक खेळाडू घडवले आहेत. त्यांनी सात वेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले असून एक वर्ष कर्णधारपद भूषवले आहे. तसेच तीन वेळा मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून एक वेळा कर्णधारपद भूषवले आहे.

व्रंदा मतकरी

मॅक्स म्युलर भवन, मुंबई आणि मुनीच येथील गोएथ इन्स्टिट्यूट मधून ऍडव्हान्स लेव्हल जर्मन भाषा शिकलेल्या व्रंदा उमेश मतकरी या आयकर विभाग मुंबईच्या सहआयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मिशिगन युनिव्हर्सिटीद्वारे ऑनलाइन अकाउंटिंग फॉरेन्सिक्स आणि फसवणूक परीक्षा ८० टक्के गुणांनी त्यांनी उत्तीर्ण केली आहे. मुंबईच्या पोतदार महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉम, मुंबई विद्यापीठातून इतिहास आणि आंतरराष्ट्रीय राजकारण विषयात एम.ए तसेच रुपारेल महाविद्यालयातून एलएलबी तर वेल्लोर येथून इंडस्ट्रिअल सायकोलॉजी विषयात त्यांनी एमएस केले आहे. CBDT चा ऑडिटर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना पुरस्कृत केले आहे. जर्मन भाषेच्या आवडीबरोबरच त्यांना वाचन, चित्रपट पाहणे, बागकाम, प्रवास आणि साहसी खेळ खेळायला आवडतात.

स्वाती बेडेकर- खरे

स्पेशलाइज्ड कंट्रोल पॅनलचे डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या Tan Swa Technologies Inc या कंपनीत गेल्या ३३ वर्षांपासून अकाउंट्स, ऍडमिन, बँकिंग, कर आकारणी (टॅक्सेशन) आणि उत्पादन (प्रोडक्शन) विभागात कार्यरत असणाऱ्या स्वाती बेडेकर- खरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात. लग्नापूर्वी दोन वर्षे त्यांनी मास्केटमध्ये काम केले आणि लग्नानंतर 1990 मध्ये पती संजय खरे यांच्यासोबत व्यवसाय सुरू केला. श्री. खरे यांनीही त्या आधी सीमेन्स लिमिटेडमध्ये 6 वर्षे काम केले होते. त्यानंतर Tan Swa Technologies Inc ही फर्म सुरु करून स्पेशलाइज्ड कंट्रोल पॅनलचे डिझाइन आणि उत्पादन सुरु केले. त्यांच्या फर्मतर्फे अल्फा लावल, रॉकवेल, हनीवेल आदी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना या पॅनल्सचा पुरवठा केला जातो. तसेच इतर अनेक देशांमध्ये पॅनल निर्यात केले जातात. नियोजित वेळेत चांगल्या दर्जाचे पॅनल कंपनीतर्फे वितरित करण्यात येतात. गेल्या १० वर्षांपासून विद्यादान सहाय्यक मंडळ या स्वयंसेवी संस्थेशी संलग्न असून येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना निधीही दिला जातो.

डॉ. उल्का नातू- गडम

प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ, एमडी, डॉ. उल्का नातू- गडम नौपाड्यातील नेस्ट हॉस्पिटलच्या संचालिका आहेत. मुंबई विद्यापीठातून त्यांनी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विषयात डिप्लोमा केला आहे. तर ISAR प्रमाणित क्लिनिकल भ्रूणशास्त्रज्ञ म्हणून त्या परिचित आहेत. सरकार मान्यताप्राप्त योग शिक्षणाचा डिप्लोमा आणि मुंबई विद्यापीठातून योगाचा ऍडव्हान्स डिप्लोमा त्यांनी केला आहे. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच त्या सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. त्या घंटाळी मित्र मंडळाच्या उपाध्यक्ष, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयच्या योग प्रमाणपत्र बोर्डाच्या उपाध्यक्षा, बोर्ड ऑफ स्टडीज इन योगा अँड अलाईड सायन्सेसच्या उपाध्यक्षा, लोणावळा येथील सेठ जीएस कॉलेज ऑफ योग कैवल्यधाम येथे सहायक प्राध्यापक, कैवल्यधाम लोणावळा येथे योगमीमांसा जर्नल ऑफ सायंटिफिक योग रिसर्चच्या नैतिकता समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयतर्फे माता आणि बाल आरोग्यासाठी योग तज्ञ म्हणून त्यांनी काम केले आहे. आरोग्याशी संबंधित विषयांवर गेली ३० वर्षे दूरदर्शन आणि रेडिओवर त्यांचे नियमित कार्यक्रम होत असतात. योग आणि मधुमेहावरील संशोधनावर त्यांनी प्रकाशन केले आहे. त्यांना योगरत्न पुरस्कार, योगमित्र पुरस्कार, ई टीव्हीचा तेजस्विनी पुरस्कार, वूमन ऑफ सबस्टन्स पुरस्कार, ठाणे शहराचा नवदुर्गा पुरस्कार, लोकमत सखी सन्मान पुरस्कार, आदिशक्ती पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. व्यवसायापलीकडे जाऊन उत्कटतेने असामान्य कामगिरी केल्याबद्दल भारतीय वैद्यकीय संघटनेने (इंडियन मेडिकल असोसिएशन) 25th hour award ने त्यांना सन्मानित केले. योग आणि स्त्रीरोगशास्त्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्राध्यापक म्हणून अनेक आमंत्रित भाषणे त्यांनी दिली आहेत. ऑस्ट्रेलिया, यूएसए, दुबई येथे योग विषयावर निमंत्रित भाषणे दिली आहेत.

डॉ. ज्योती नायर

न्यू होरायजन स्कॉलर स्कुलच्या रिजनल डायरेक्टर डॉ. ज्योती नायर यांना गेल्या २० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव आहे. शाळा प्रशासन आणि शैक्षणिक क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव आहे. विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम, अभ्यासक्रम विकास आणि त्याची अंमलबजावणी करणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन आणि संचालन करणे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आणि कार्यशाळा राबवणे, परदेशातील अभ्यासदौऱ्यांचे नियोजन करणे, शिक्षण विभागाशी संपर्क साधून योग्य मेळ घालण्याचे प्रमुख कार्य डॉ. नायर प्रभावीपणे करत असतात. त्याचबरोबर सुरक्षित वातावरणातील शिक्षणाला प्रोत्साहन देणारी धोरणे आणि पद्धती तयार करणे, त्यांचे परीक्षण करणे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सतत सुधारणांना प्रोत्साहन देणारी शालेय संस्कृती सुनिश्चित करण्यासाठी डॉ. नायर प्रयत्नशील आहेत. राज्य शिक्षण नियमांच्या संयोगाने वर्ग सूचना, पाठ योजना, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणे तसेच शाळांच्या एकूण क्रियाकलापांचे नियोजन, नियंत्रण आणि निर्देश करण्याची जबाबदारी त्या सहजपणे पार पाडतात. मार्च २०२२ मध्ये त्यांना महाराणा प्रताप राजपूत संघातर्फे आयोजित कार्यक्रमात भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डायनामिक सोशल लीडर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. मनीषा पाठक

आरोग्य सेवा व्यवस्थापनात गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ. मनीषा पाठक एम आर आर रुग्णालयाच्या उपाध्यक्षा आहेत. आरोग्यसेवेतील 24 वर्षांचा अनुभव त्यांच्या करिअरच्या प्रगतीमध्ये पुढचे पाऊल टाकू पाहत आहे. क्लिनिकल प्रक्रिया, जनसंपर्क विभाग, बजेट आणि आर्थिक विश्लेषण, कॉर्पोरेशन ते कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये हॉस्पिटल सेटअपमधील सुधारणा आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग यासह 360 डिग्री व्यवस्थापनाचा डॉ. पाठक यांना अनुभव आहे. त्यांनी प्रत्येक स्थितीत उत्कृष्ट कामगिरी करून अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवले आहे. एप्रिल २०२१ पर्यंत फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथे ‘हेड मेडिकल सर्व्हिसेस’ म्हणून त्या काम करत होत्या. 24 ऑगस्ट 2018 ते मार्च 2021 पर्यंत ठाण्यातील पटनी ग्रुपच्या क्युरे हॉस्पिटलमध्ये त्यांनी ‘केंद्रप्रमुख’ म्हणून काम केले आहे. ऑक्टोबर 2014 ते 14 ऑगस्ट 2018 या कालावधीत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, उत्तर मुंबई युनिट येथे ‘व्यवस्थापक- रुग्णालय प्रशासन’ म्हणून काम केले आहे. याव्यतिरिक्त ‘हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर’, कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल, ठाणे येथे ‘मुख्य वैद्यकीय अधिकारी’ म्हणून काम केले आहे.