महायुतीचा वचननामा जाहीर
ठाणे: महायुतीने आपला वचननामा जाहीर केला असून यामध्ये ठाणे शहराला स्मार्ट आणि ग्लोबल बनवण्याचा निर्धार केला आहे. वचननाम्यात सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्यात आले आहे. सर्वसामान्य माणसाला परवडणारे घर, क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेच्या माध्यमातून जुन्या व धोकादायक इमारतींच्या समस्येवर तोडगा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा वचननाम्यात समावेश करण्यात आला आहे.
आज आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, विलास जोशी यांच्या हस्ते अहवालाचे प्रकाशन झाले.
आरोग्य, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा यावरही विशेष भर देण्यात आला आहे. शहरात दवाखाने, आरोग्य केंद्रे, स्वच्छतेच्या सुविधा अधिक सक्षम करण्याचे आश्वासन वचननाम्यात देण्यात आले आहे. यासोबतच ठाण्यात सुरू असलेले मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, उन्नत मार्ग यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे ठाणे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा महायुतीचा मानस आहे. ठाण्यात सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार असून, द्रुतगती मार्गांद्वारे बोरीवली, मीरा-भाईंदर ते ठाणे हे अंतर अधिक जवळ आणण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत. या सर्व विकासकामांमुळे ठाण्यातील अनेक भाग मुंबईप्रमाणे विकसित करण्याचा उद्दिष्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवले आहे.
महायुतीच्या वचननाम्यात ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण आराखडा मांडण्यात आला आहे. भविष्यात ठाण्यात ३६० मीटर उंच लँडमार्क टॉवर आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार असून, यामुळे शहराच्या आर्थिक उलाढालीला मोठी चालना मिळणार आहे. शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक धरणांच्या कामांना गती दिली जाणार असून, डीसॅलिनेशन प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढवली जाणार आहे. ठाण्याचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ऐतिहासिक मंदिरांचे जतन, सांस्कृतिक संकुलांची उभारणी तसेच संग्रहालयांची निर्मिती केली जाणार आहे. यासोबतच डिजिटल युनिव्हर्सिटी, विज्ञान केंद्र, टाऊन पार्क, स्टेडियम, फायर फायटिंग क्षमता वाढवणे आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला आहे. या वचननाम्याच्या माध्यमातून ठाणे शहराला आधुनिक, सुरक्षित आणि नागरिकांना उत्तम जीवनशैली देणारे शहर बनवण्याचा महायुतीचा निर्धार स्पष्ट होत आहे.
महायुतीच्या वचननाम्यात ठाणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक व सुरक्षित रूप देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. ठाणे बुलेट ट्रेन स्टेशन येथे मल्टीमोडल इंटिग्रेशन करण्यात येणार असून, मेट्रोद्वारे ठाणे कोपर-तळोजाशी जोडले जाणार आहे. मनोरंजनालयाच्या जागी नवीन ठाणे स्थानकाची उभारणी पूर्ण करून सीमलेस कनेक्टिव्हिटीसाठी तीन हात नाक्याशी जोडणी केली जाणार आहे. ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी करून जागतिक दर्जाचे स्थानक उभारण्यात येणार असून, कळवा–ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाची रखडलेली कामे पूर्ण केली जाणार आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा वाढवून गर्दीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, या मार्गावरील सर्व स्थानके स्मार्ट करण्यात येणार असल्याचे वचननाम्यात नमूद करण्यात आले आहे.
पहिले झोपडपट्टीमुक्त शहर
महायुतीच्या वचननाम्यात ठाणे शहराला देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. अधिकृत कागदपत्रांसह वास्तव्यास असलेल्या कुटुंबांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर करून त्यांना सुरक्षित व हक्काचे घर देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ऐतिहासिक क्लस्टर योजनेच्या माध्यमातून धोकादायक इमारती व झोपडपट्ट्यांमधील कुटुंबांचे पुनर्वसन जलद गतीने केले जाणार असून, पुढील २० वर्षांत लाखो कुटुंबांना पक्की व हक्काची घरे देण्याचे नियोजन आहे.