दिव्यातील ब्राईटन व केंट व्हॅली अनधिकृत शाळा बंद करणेबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक

दिवा : दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या ब्राईटन इंटरनॅशनल स्कूल खर्डीगाव व केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, सुदामा रेंजन्सी अशा एकूण दोन खासगी अनधिकृत इंग्रजी माध्यमाची आणि सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम असलेली शाळा विनापरवानगी सुरू असल्याचे पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या चौकशीत निष्पन्न झाले होते. ही शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश ठाणे पालिकेच्या शिक्षण मंडळाकडून देऊन देखील शाळा सुरूच राहिल्याने पालिका शिक्षण मंडळाने अखेर कारवाईचा बडगा उभारत दोन्हीही शाळा चालकाविरुद्ध भादवी कलम १८८ नुसार डायघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र ०४८०/२०२३ दाखल करुन देखील आजतागायत या शाळा जोमाने सुरूच आहेत याचीच दखल घेत दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हा सल्लागार मंडळाने पुन्हा कारवाई करण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयास दिले आहे.
 ब्राईटन इंटरनॅशनल स्कूल खर्डीगाव व केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, सुदामा रेंजन्सी या दोन्ही शाळा शासनाची मान्यता नसतानाही सुरु आहेत. या शाळेतील व्यवस्थापक व मुख्याध्यापकांनी या शाळेचे लेटर पॅड, मुख्याध्यापकांचे शिक्के, शाळेचे शिक्के, शाळा सोडल्याचे दाखले, फी पावती पुस्तक व देणगी पुस्तक पावत्या बोगसपणे तयार केलेल्या आहेत. शासनाची दिशाभूल करून इरादापत्र मिळवले असून शासन नियमांनुसार पाच गुंठा जमीन हवी असताना केंट शाळा रहिवाशी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भरवली जाते. अनधिकृत शाळेमुळे विद्यार्थ्यांची व समाजाची घोर फसवणूक होऊ शकते. प्रकारणी या बाबत हिवाळी अधिवेशना मध्ये आमदार मा. संजय केळकर (ठाणे विधानसभा) यांनी या बाबत प्रश्न उपस्थित केला होता. सदर शाळा तात्काळ बंद करण्यात याव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांची व समाजाची फसवणूक होणार नाही असे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयास देण्यात आले आहे.