ठाणे: लिटिल फ्लॉवर शाळेच्या व्यवस्थापनाला एकरकमी फी पाहिजे असल्यामुळे शाळेकडून अंदाजे ३५० विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू न दिल्याबद्दल पालकांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापन कमिटीची भेट घेऊन जाब विचारला.
शाळेच्या व्यवस्थापनाच्या वतीने विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अमानुष वागणुक दिली जाते, याचा पाढाच पालक युवासेनेपुढे वाचू लागले. पालकांनी सांगितले की, शाळेच्या व्यवस्थापनाकडून ज्या मुलांची फी बाकी आहे त्या मुलांना वॉशरूमला न पाठविणे, वॉशरूमला जायचे असल्यास पन्नास रूपये फाईन लावणे, मुलींनी कपाळाला टिकली लावली असल्यास पन्नास रूपये फाईन, विद्यार्थी मराठीत बोलताना दिसल्यास पन्नास रूपये फाईन, विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणे, अशा पध्दतीने शाळेच्या व्यवस्थापनाचा मनमानी कारभार चालू असल्याचे निर्दशनास येत आहे. तसेच हा व्यवहार रोखीने होत असल्यामुळे त्याचा कुठेही लेखी हिशोब नाही, अशा अनेक तक्रारी युवासेनेकडे करण्यात आल्या.
पालकांकडून या सर्व तक्रारी ऐकल्यानंतर पुर्वेश सरनाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांची भेट घेतली. वरील सर्व तक्रारींबाबत जाब विचारला व कोणत्याही विद्यार्थ्यांला शाळा व्यवस्थापन परिक्षेपासून वंचित ठेवू शकत नाही, अशा शब्दात ठणकावून सांगण्यात आले. यावर शाळेने दिलगिरी व्यक्त करत व पालकांच्या नावे माफीनामा देत ज्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेतल्या नव्हत्या त्या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या दिवशीचा बुडलेला पेपर सोमवार २२ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याचे माफीनाम्यात कबुल केले व उद्यापासूनचे नियमित पेपर घेण्यात येतील, असे शाळेच्या व्यवस्थापनाने सांगितले. तसेच शाळेला फी घेण्याचा जसा अधिकार आहे तसचा उत्तम शिक्षण व सुविधा मिळणे हा विद्यार्थ्यांचा मुलभुत अधिकार आहे याची जाणिव श्री. पुर्वेश सरनाईक यांनी शाळा व्यवस्थापनाला करून दिली.
शाळेच्या वतीने पालक व विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास देण्यात आला यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित शाळेवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पुर्वेश सरनाईक यांनी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आंदोलन केले त्यांच्या पाल्यास शाळेतर्फे कोणताही त्रास होणार नाही यासाठी युवासेना कायम कटिबध्द असेल असा शब्द पुर्वेश सरनाईक यांनी पालकांना दिला.
यावेळी युवासेना सचिव राहुल लोंढे, युवासेना महाराष्ट्र समन्वयक नितिन लांडगे, विराज निकम, ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने तसेच सुशांत मयेकर, अखिल माळवी हे शिष्टमंडळात सहभागी झाले होते.