* विहित वेळ आणि नियमांची मोडतोड कोंडीस कारण
ठाणे: अवजड वाहनांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने जाण्याचा नियम असतानाही ठाण्यातील महामार्गावरून कुठल्याही मार्गिकेमधून गाड्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून हजारो गाड्या दरदिवशी जात असतात. ठाण्यातून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवरून अनेक मोठमोठे कंटेनर, तसेच अवजड वाहन ये-जा करत असतात. भिवंडी भागातील गोडाऊनमध्ये जाण्यासाठी तसेच दिल्ली, गुजरात, बेंगलोर, पुणे या भागातील कंपन्यांमधील माल या मार्गानेच इतर राज्यांत जातो, परंतु हे साहित्य घेऊन जाणारी मोठी वाहने कधीही डाव्या मार्गिकेचा वापर करत नाहीत. त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे वाहतूक पोलिस सांगत असले तरी चिरीमिरी घेऊन या वाहन चालकांना मोकळीक दिली जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हे वाहनचालक उजव्या बाजूने गाडी चालवत असतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात देखिल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
अवजड वाहने बेशिस्तपणे मार्गिकांचा नियम डावलून वाहतूक करत असल्याने घोडबंदर, ठाणे-नाशिक बायपास, कळवा ते महापे, मुंब्रा-शिळफाटा, तळोजा, डोंबिवली या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
अवजड वाहनांना सकाळी सात ते ११ आणि संध्याकाळी ६ ते रात्री १०पर्यंत शहरी भागातील रस्त्यावर बंदी असतानाही ही वाहने त्या वेळात सर्रास वाहतूक करत असल्याने वाहतूक पोलिसांच्या विरोधात ठाणेकर नाराजी व्यक्त करत आहेत.
देशातील इतर भागांत अवजड वाहने डाव्या बाजूनेच जात असतात, परंतु महाराष्ट्रात मात्र सर्रास नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे एका जागरूक नागरिकाने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.