अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवकांना यावेळी मिळणार महापौर पदाची संधी
ठाणे: महायुतीत लढलेल्या शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक ७५ जागा मिळाल्या असून त्यांचाच महापौर होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र हे पद पटकावण्यासाठी लोकमान्यनगर, वागळे इस्टेट आणि बाळकुम भागातील नवनिवचित नगरसेवकांनी फिल्डिंग लावली आहे. यावेळी अनुभवी, ज्येष्ठ तसेच जास्त टर्म निवडून येणाऱ्या नगरसेवकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कळते.
ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आले असून युतीमधील भाजपला फक्त २८ जागांवर विजय मिळवता आला आहे. अर्थात शिवसेनेला पूर्ण बहुमत असल्याने आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर पदाच्या शर्यतीत प्रभाग ८ मध्ये गेल्या पाच दशकांपासून वर्चस्व गाजवणारे भोईर कुटुंब आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. यामध्ये देवराम भोईर, संजय भोईर आणि उषा भोईर या नावांचा प्रामुख्याने समावेश आहे. किसननगर येथील प्रभाग क्रमांक 17 मधून सलग तीन दशकांपासून निवडून येणारे राम रेपाळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. पक्षाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या रेपाळे यांच्यावर शिंदेंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती.
प्रभाग क्रमांक 6 मधून गेल्या पाच दशकांपासून सातत्याने निवडून येणारे हनुमंत जगदाळे हे ठाण्याच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात वाढवण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली होती, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यामुळे लोकमान्य आणि शास्त्रीनगर परिसरात शिवसेनेला मोठे बळ जगदाळे यांच्यामुळे मिळाले होते. जगदाळे यांनी आपले संपूर्ण पॅनल निवडून आणले असून त्यांच्याकडे असलेला प्रशासकीय कामाचा आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेता, ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांच्या नावाचा विचार महापौर पदासाठी केला जाण्याची शक्यता आहे.