ठाणे: आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल मार्च महिन्यात वाजणार असल्याची शक्यता व्यक्त होत असतानाच मुख्य निवडणूक आयोगाने १६ एप्रिलला मतदान होणार असल्याचा अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीची तयारी करा असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यातील निवडणूक विभागाला दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी टी. मासिओ यांनी १९ जानेवारी रोजी सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करावे, निवडणूकीकरिता लागणारा कर्मचारी वर्ग, पोलिस यंत्रणा, मतदान यंत्र, पोलिंग बूथची जागा निश्चित करणे त्याकरिता लागणारी सामुग्री आदीची तयारी वेळेत पूर्ण करावी असे म्हटले आहे. सार्वत्रिक निवडणुकीचे नियोजन करणाऱ्या समितीने तात्पुरती १६ एप्रिल ही तारीख गृहीत धरली आहे. त्या दृष्टीने काम करावे असे आदेश दिले आहेत.
हे पत्र आल्यानंतर आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीबाबत बैठक घेण्यात आली होती. मतदार याद्या, मतदान केंद्र, पोलिस यंत्रणा, कर्मचारी वर्ग याबाबत चर्चा झाली होती. ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण हे तीन लोकसभा मतदार संघ आहेत. त्या मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदार संघ आहेत, किमान एक हजार ते अकराशे मतदार एका मतदान केंद्रावर मतदान करतील. शक्यतो पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर किती पोलीस तैनात करायचे तसेच संवेदनशील मतदान केंद्राची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.
ही तारीख केवळ निवडणूक आयोगाच्या निवडणूक नियोजनानुसार कामाची आखणी करण्यासाठी अधिकार्यांच्या संदर्भासाठी अध्यादेशात नमूद करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने चौकशी करणाऱ्या पत्रकारांना दिली. याबाबत आयोगाने लेखी खुलासाही प्रसिद्ध केला आहे.