सेंट्रल पार्कमधील गर्दीमुळे स्थानिक रहिवासी हैराण

वाहतूक कोंडीमुळे सुट्टीच्या दिवशीही रस्ते जाम

ठाणे : तब्बल २० एकरमध्ये बांधण्यात आलेले सेंट्रल पार्क हे ठाणेकर आणि ठाण्याच्या बाहेरील नागरिकांसाठी पर्वणी ठरत असली तरी या पार्कमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे स्थानिक नागरिक मात्र हैराण झाले आहेत. शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशीही वाहने पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिकांना घराच्या बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे पार्कला जाण्यासाठी पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सेंट्रल पार्कचे उदघाटन करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १७ हजार नागरिकांनी या सेंट्रल पार्कला भेट दिली होती. त्यानंतर हे पार्क बघण्यासाठी नागरिकांची गर्दी सुरूच आहे. कोलशेत गाव, हायलँड, ढोकाळी भागात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्या तुलनेत ढोकाळी-कोलशेत रस्ता अरुंद आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर चालकांना कोंडीचा सामना करावा लागत असतो. काही महिन्यांपूर्वी ठाणे महापालिका आणि वाहतुक विभागाने कापूरबावडी येथून ढोकाळीच्या दिशेने वाहतुक करणारी मार्गिका बंद केली. त्यामुळे वाहन चालकांना हायलँडमार्गे प्रवास करावा लागतो. त्यामुळे सेंट्रल पार्कमुळे होणाऱ्या कोंडीचा परिणाम हायलँड आणि ढोकाळी मार्गावरही दिसू लागला आहे.

कल्पतरू पार्कसिटीच्या रस्त्यावर देखील कोंडी असते. कोलशेत भागातील नागरिक कोंडीमुळे सांयकाळी बाहेर पडणे टाळू लागले आहेत. सेंट्रल पार्कमुळे कोलशेत रोड परिसरात कोंडी होते. त्यामुळे येथे वाहतुक साहाय्यक उपलब्ध करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.