ऑक्टोबर ते जानेवारीमध्ये होणार स्थानिक निवडणुका

नाशिक: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

आगामी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा कार्यक्रम टप्प्याटप्याने घेण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका एकत्रित घेण्यासाठी मनुष्यबळ कमी पडेल. त्यामुळे टप्याटप्याने निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पण पहिली निवडणूक कोणती होईल ते अद्याप निश्चित नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्ही पॅट मशिन राहणार नाही, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.

येत्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाईल. मागील निवडणुकीत तेच वापरले होते. निवडणूक चांगल्या पद्धतीने घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील. १ जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील. कुठले मतदान निश्चित करायचे, कुठले काढून टाकायचे याचे अधिकार निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक कधी लागेल आज सांगता येत नसले तरी दिवाळीनंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे असे दिनेश वाघमारे यांनी म्हटले.