नवी मुंबई: १ जुलैपासून सुरू झालेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज स्वच्छता व आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात असून सेक्टर्सप्रमाणेच गावठाण व झोपडपट्टी भागातही स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत आहेत तसेच स्वच्छताविषयक व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त संजय शिंदे यांच्या निरीक्षणाखाली आठही विभागांचे सहाय्यक आयुक्त व स्वच्छता अधिकारी यांच्या माध्यमातून झोपडपट्टी परिसरात ‘स्वच्छ घर, स्वच्छ झोपडपट्टी’ मोहीमा राबविण्यात आल्या तसेच घरातूनच कचरा वर्गीकरण करण्याचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे हा वर्गीकरण झालेला कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकता महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांमध्येच टाकावा याची दक्षता घेण्याचेही आवाहन नागरिकांना करण्यात आले.
नेरुळ विभागाचे सहायक आयुक्त जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांच्या माध्यमातून शिवाजीनगर झोपडपट्टी या ठिकाणी, तुर्भे विभागाचे सहा.आयुक्त सागर मोरे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली हनुमान नगर झोपडपट्टी येथे, घणसोली विभागाचे सहायक आयुक्त उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी विजय पडघन यांच्या नियंत्रणाखाली काफरीबाबा नगर येथे, ऐरोली विभागाचे सहायक आयुक्त सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली समतानगर ऐरोली नाका याठिकाणी, दिघा विभागाचे सहायक आयुक्त नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी प्रविण थोरात यांच्यामार्फत दुर्गानगर, गणेशनगर या झोपडपट्टी भागात तसेच इतर विभाग कार्यालयांच्या हद्दीतही विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छताकर्मी यांच्या मदतीने ‘स्वच्छ घर, स्वच्छ झोपडपट्टी’ ही मोहीम यशस्वीरित्या राबविली.