अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात विजय गोखले यांना जीवनगौरव

‘आदिशेष’ला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

अंबरनाथ: अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि अंबर भरारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात आदिशेष चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बाजी मारली. याच महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना त्यांच्या नाट्य, चित्रपट सृष्टीतील प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि अंबर भरारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी येथील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहातील बाळ कोल्हटकर रंगमंचावर झालेल्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात ‘आदिशेष’ या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवले गेले. तर ‘गुलकंद’ या सिनेमासाठी सचिन गोस्वामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. महोत्सवात विविध विभागांमध्ये एकूण ५० हून अधिक पारितोषिके प्रदान करण्यात आली.

नामवंत कलावंतांबरोबरच रंगभूषा सारख्या तांत्रिक गोष्टींना पुरस्कार दिल्याबद्दल प्रकाश नेमकर आणि अतुल सिधये यांनी समाधान व्यक्त केले. पुरस्कार सोहळ्यास अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेते अरुण नलावडे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौगुले, प्रणव रावराणे, लेखक सचिन मोटे यांच्यासह दिग्गज कलावंत उपस्थित होते.

आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, महोत्सवाचे आयोजक नगरसेवक निखिल चौधरी, गुणवंत खेरोदिया, महोत्सव दिग्दर्शक महेंद्र पाटील, महेश सुभेदार, अभय शिंदे, डॉ. राहुल चौधरी, कुणाल चौधरी, अभिनेत्री इरावती लागू, दत्ता घावट आदी यावेळी उपस्थित होते.

सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सुबोध भावे यांना चित्रपट सकाळ तर होऊ द्या, प्रणव रावराणे यांना चित्रपट आदिशेषसाठी विभागून पारितोषिक देण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मानसी नाईक, चित्रपट सकाळ तर होऊ द्या, सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट भावलीचं लगीन,
सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट गुलकंद, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक स्वप्निल बांदोडकर, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता समीर चौगुले गुलकंद, सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्री विशाखा सुभेदार चित्रपट वेलडन आई, सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेता अरुण नलावडे चित्रपट आदिशेष, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चेहरा म्हणून जयवंत वाडकर यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. कारकीर्द गौरव पुरस्कार रंगभूषाकार अतुल सिधये तर कारकीर्द सन्मान पुरस्कार वेशभूषाकार प्रकाश निमकर यांना देण्यात आला. नामवंत कलावंतांबरोबरच रंगभूषा सारख्या तांत्रिक गोष्टींना पुरस्कार दिल्याबद्दल प्रकाश नेमकर आणि अतुल सिधये यांनी समाधान व्यक्त केले.

आमदार डॉ. बालाजी किणीकर, सुनील चौधरी, निखिल चौधरी, गुणवंत खेरोदिया, महोत्सव दिग्दर्शक महेंद्र पाटील, महेश सुभेदार, अभय शिंदे, डॉ. राहुल चौधरी, कुणाल चौधरी, अभिनेत्री इरावती लागू, दत्ता घावट आदी यावेळी उपस्थित होते. अमेय रानडे आणि जगदीश हडप ह्यांनी सूत्रसंचलन केले.

माझे गुरू भाषाप्रभू बाळ कोल्हटकर यांच्या नावाने असलेल्या अंबरनाथमधील रंगमंचावर आयुष्यातला पहिला जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे,’ अशा भावना विजय गोखले यांनी व्यक्त केल्या. यावेळेस त्यांनी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातील काही काव्यपंक्ती सादर केल्या. त्याला रसिकांनी टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गेल्या अनेक वर्षांपासून मोकळ्या जागेत साजरा होणारा चित्रपट महोत्सव यंदा नगरपालिकेच्या प्रशस्त धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात साजरा झाल्याने समारंभाने उंची गाठली. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौगुले आणि अरुण नलावडे यांच्यासमवेत सेल्फी घेण्यासाठी रसिकांची लगबग सुरू होती. या दोघांनीही रसिकाना प्रतिसाद दिला. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते रंगभूमी पूजन करण्यात आले.