डुकरासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

भाईंदर : उत्तन येथील पालखाडी परिसरात दहशत माजविणारा बिबट्या अखेर आज सकाळी पिंजऱ्यात सापडला. स्थानिक रहिवाशाने डुकरांसाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या आढळून आल्याने रहिवाशांनी घटनास्थळी गर्दी केली. अखेर संजय गांधी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर बिबट्याला घटनास्थळावरुन नेल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मागील तीन-चार महिन्यापासून उत्तन परिसरात आढळून येणाऱ्या बिबट्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण होते. स्थानिकांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करुन त्यांना भक्ष्य बनविल्याने सदर बिबट्याची खबर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी उत्तन परिसराची पहाणी करुन ठिकठिकाणी कॅमेरे बसविले. मात्र त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी केली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. पालखाडी परिसरातील स्थानिक रहिवाशाने डुकरे पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य शोधण्यासाठी आलेला बिबट्या अलगद सापडला. या घटनेची माहिती वनविभागासह स्थानिक पोलिसांना देण्यात आली. काही वेळाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस व मीरा-भाईंदर महापालिका अग्निशमन सेवा अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर बिबट्याला घटनास्थळावरून हलविण्याचा आदेश दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यासह घेऊन गेले.