साजिवली-सावरशेतचे विद्यार्थी दहशतीखाली
शहापूर: तालुक्यातील भातसानगर हद्धीतील साजीवली व सावरशेत या गावांमध्ये एस.टी.बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे बंद झाले आहे. गावापासून तीन किलोमीटर भातसानगर शाळेत पायी चालत जाण्याची विद्यार्थ्यांची इच्छा आहे. मात्र या भागात बिबट्याचा वावर असल्याने भीतीपोटी शाळेत पायी जाण्याचे धाडस होत नाही. यामुळे सावरशेत व साजीवली गावातील तब्बल 25 ते 30 विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट बिकट झाल्याचे चित्र आहे.
शहापूर तालुक्यातील साजिवली व सावरशेत गावापासून भातसानगर शाळेर्यंतचे अंतर साधारण दोन ते तीन किलोमीटरचे आहे. या ठिकाणी माध्यमिक शाळा नसल्याने येथील जवळपास 25 ते 30 विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी प्रकल्प विद्यालय भातसानगर शाळेत जात असतात. मात्र या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याअभावी एस.टी.बस जात नाही. दुसरीकडे या भागात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता असल्याचे शहापूर वन परीक्षेत्र हद्दीतील बिरवाडी परिमंडळ यांच्याकडून फलक लावून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून एस.टी.अभावी पालकांची विद्यार्थ्यांना शाळेत पायी पाठवण्याची इच्छा असूनही ते भीतीपोटी मुलांना पाठवू शकत नाहीत. दरम्यान या भागातील रस्ता लवकरात लवकर सुरु करुन एस.टी.बस पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.
शाळेत जायला बस सुरु नसल्याने मुलांना शाळेत पायी पाठवण्याची भीती वाटते. काही मुले पायी चालत जातात. बिबट्याचा वावर असल्याने मुले घरी येईपर्यंत आमच्या जीवात जीव नसतो. एकीकडे शेतीची कामे चालू आहेत. मुलांना ने-आण करण्यास पायी जायला आम्हाला वेळ देता येत नाही, असे साजीवली येथील पालक रूपाली भोईर यांनी सांगितले.
साजीवली-सावरशेत या गावाकडे जाणारा रस्ता सुस्थितीत असून एस.टी.बस नेण्यासंदर्भात शहापूर आगार प्रमुखांना पत्र दिले आहे. बस सुरु करण्यास हरकत नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभाग, शहापूरचे कार्यकारी अभियंता बलवंत कांबळे यांनी सांगितले.