पीडब्ल्युडीच्या दुर्लक्षामुळे शिधावाटप कार्यालयात गळती

आमदार संजय केळकर यांच्याकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

ठाणे: आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या शिधावाटप कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळाले, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे पुन्हा समस्या भेडसावू लागल्या आहेत. श्री.केळकर यांनी कार्यालयास भेट दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यावेळी उपस्थित पीडब्ल्युडीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.

ठाण्याचे आमदार संजय केळकर लयांनी ठाण्याच्या कोर्ट नाका येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात असलेल्या शिधावाटप कार्यालयाला अचानक भेट दिल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. शिधावाटप कार्यालयात केलेल्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाल्याचे आ. केळकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले. यावेळी कार्यालयाच्या मुख्य अधिकारी श्रीमती चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिन पाटिल आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

आ. केळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पडझड झालेल्या या शिधावाटप कार्यालयाचा कायापालट केला होता. त्यामुळे या कार्यालयाला आय. एस. ओ. मानांकन मिळाले होते. आज या कार्यालयाला आ. केळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामासाठी आलेल्या नागरिकांनी आ. केळकर यांची भेट घेऊन संवाद साधला.

या कार्यालयात पाहणी करताना आ. केळकर यांना स्वच्छतागृहाची दुरावस्था दिसून आली तसेच पत्रा, स्लॅबची गळती सुरु आहे. या कार्यालयाच्या आवारात असलेले जांभळाचे झाड पडायला आले आहे. आणि ते कार्यालयावर केव्हाही पडू शकते. शिवाय मधल्या वाटेवर पेव्हर ब्लॉक लागणे आवश्यक असल्याचे आ. केळकर यांच्या पाहणी दरम्यान निदर्शनास आले. परिसरात घाण दिसून आली. या सर्व बाबी पाहणी दरम्यान निदर्शनास आल्यावर आ. केळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर आगपाखड केली. तातडीने ही सर्व कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी १०-१२ दिवसांत कामे पूर्ण करणार असल्याचे आ. केळकर यांना सांगितले.

शिधावाटप कार्यालयात नागरिकांची दररोज ये-जा असते. त्यामुळे हे कार्यालय सुस्थितीत असणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी लवकर काम पूर्ण होणार असल्याचे जरी सांगितले असले तरी मी पुन्हा या कार्यालयास भेट देणार असल्याचे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.