नवी मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दांपत्य गुरुवार, २५ जानेवारी २०२४ पासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात आला असता दांपत्याची हत्या झाल्याबाबत उघडकीस आले. सदर वकील दांपत्याचे अपहरण करून हत्या झाली, ही अतिशय निंदनीय बाब असल्याने याचा निषेध म्हणून सोमवारी नवी मुंबईतील वकिलांमार्फत वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत निषेध नोंदविण्यात आला.
या उपोषणादरम्यान वकिलांनी एकमताने महाराष्ट्रामध्ये वकील संरक्षण कायदा पारीत करण्याच्या मागणीवर जोर दिला. त्याचबरोबर राहुरी येथे झालेल्या वकील दांपत्याच्या खुनाचा सीआयडीमार्फत चौकशी करून आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ॲड. ज्ञानेश्वर कवळे, ॲड. मुरलीधर पाटील, ॲड.अजिंक्य गव्हाणे, ॲड. राजकिरण सोनार, ॲड. समीत राऊत,ॲड.अनुषा शेटे, ॲड. विशाल काटकर, ॲड.फरहा शेख, ॲड. रमेश त्रिपाठी, ॲड. सुनील मोकल आदी उपस्थित होते.