बदलापूरमध्ये दामिनी पथकासाठी दोन स्कुटींचे लोकार्पण

महिलांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढविण्यास मिळणार गती

बदलापूर : शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलत बदलापूरमध्ये दामिनी पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाच्या कार्याला गती मिळावी यासाठी दोन स्कुटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिलांना तत्काळ मदत मिळावी, शहरात नियमित गस्त वाढावी तसेच महिलांवरील गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता यावे या उद्देशाने या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

या उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी स्व.अजित पवार यांच्या स्मरणार्थ कॅप्टन आशिष दामले यांनी स्वतःच्या खर्चातून दामिनी पथकासाठी दोन स्कुटी उपलब्ध करून दिल्या. या स्कुटींच्या माध्यमातून पथकाला शहरातील विविध भागात जलद गतीने गस्त घालणे शक्य होणार आहे. तसेच महिलांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देणे आणि गरज भासल्यास त्वरित मदत पोहोचवणे अधिक सुलभ होणार आहे. बदलापूरसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या उपक्रमासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष प्रियांका दामले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांचे आभार मानण्यात आले.

याप्रसंगी डीसीपी सचिन गोरे, एसीपी शैलेश काळे, शहराध्यक्ष प्रभाकर पाटील, उपनगराध्यक्ष प्रियांका आशिष दामले, संगीता चेंदवणकर, प्रफुल अडांगळे, अनघा वरांग, संजू अहिवळे, मंगेश जाधव, गणेश पिल्लई, युवराज गिध तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल बदलापूर शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.