लेडी सिंघम : रेखा शिंदे पोलीस खात्यातील ‘महाराष्ट्र श्री’चा उज्ज्वल प्रवास

– By HASTKALA LIFE

कुस्ती हा खेळ मनापासून खेळणाऱ्या आणि फिटनेसची आवड असल्याने शरीरसौष्ठव (बॉडी बिल्डिंग) क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी, कुस्तीपटू, शरीरसौष्ठव आणि महाराष्ट्र श्री हा मानाचा किताब जिंकलेल्या रेखा शिंदे यांचा प्रवास हा जिद्दीचा, मेहनतीचा आणि स्वतःला प्रत्येक टप्प्यावर सिद्ध करण्याचा आहे.

सुरुवातीला कुस्ती हा खेळ मनापासून खेळणाऱ्या रेखा यांना फिटनेसची आवड असल्याने त्या बॉडी बिल्डिंगकडे वळल्या. पोलीस खात्यातील अंतर्गत स्पर्धांमधून त्यांनी पहिली पायरी गाठली. स्पर्धांमधून मिळणाऱ्या अनुभवाने त्यांचा उत्साह वाढत गेला. ओपन स्पर्धांमध्ये उतरायचा निर्णय हा धाडसी होता; मात्र मुंबई श्री स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्यानंतर त्यांचा यशाचा वेग आणखी वाढला. पुढे महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी तयारी करण्याची प्रेरणा त्यांना याच माध्यमातून मिळाली. त्या सांगतात की, त्यांचा बॉडी बिल्डिंगचा प्रवास 2021 मध्ये सुरू झाला. राज्यस्तरीय पोलीस स्पर्धेत सुवर्णपदक मिळणे हा पहिला मोठा टप्पा होता. त्यांनी 2023 मध्ये ओपन स्पर्धांमध्ये पाऊल टाकले आणि मुंबई श्री जिंकून आपली ओळख पक्की केली. या सगळ्यात सर्वात मोठी अडचण होती वेळ आणि जबाबदाऱ्या सांभाळणे. पोलिसांची 24 तास तयारी असलेली नोकरी आणि तितक्याच समर्पणाने करावी लागणारी व्यायामाची तयारी हा खरोखरच कठीण समतोल आहे. तरीही वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि परिवार यांच्याकडून मिळालेला पाठिंबा माझ्या या प्रवासाला बळ देणारा ठरला.

बॉडी बिल्डिंगमधील प्रशिक्षण अत्यंत कठोर असते. व्यवस्थित आहार, पुरेसा आराम आणि शिस्तबद्ध व्यायाम या तिन्ही गोष्टी परिपूर्ण असल्या तरच यश मिळते. मात्र आर्थिक आव्हान हे सर्व बॉडी बिल्डर्ससाठी मोठे असते. आहार, सप्लिमेंट, जिम, प्रवास यावर होणाऱ्या खर्चाचे व्यवस्थापन करून सांभाळावे लागते. आर्थिक शिस्त नसती तर माझा प्रवास इथपर्यंत पोहोचू शकला नसता असे त्या मान्य करतात. महिलांसाठी बॉडी बिल्डिंग अधिक आव्हानात्मक आहे कारण महिलांची नैसर्गिक शरीररचना स्नायूविकासासाठी जास्त अनुकूल नसते. त्यामुळे त्यांना अधिक मेहनत, शिस्त आणि सातत्याने प्रयत्न करावे लागतात. त्यात समाजातील एक ठराविक दृष्टीकोन आणि नकारात्मक अनुभवही झेलावे लागतात. पण मला हे सर्व पार करायचं होतं आणि मी ते केलं, असे त्या सांगतात.

“जर मी महाराष्ट्र श्री होऊ शकले, तर भारत श्री ही नक्की होईन,” हे त्यांनी त्या क्षणीच स्वतःला दिलेले वचन. त्यांचा हा आत्मविश्वासच त्यांच्या पुढील वाटचालीचा पाया आहे. त्यांच्या यशामागे त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार, गुरु रोशन खराडे आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचे मोठे योगदान आहे. पोलीस खात्यातील फिटनेसची गरज, गुन्हेगारीशी सामना करण्यासाठी लागणारी शारीरिक ताकद या गोष्टींमुळे रेखा यांच्या खेळाडूवृत्तीला योग्य दिशा मिळाली. स्पर्धांच्या पलीकडे रेखा शिंदे शांत, मितभाषी आणि कामातून स्वतःला सिद्ध करणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांना वाचनाची आवड आहे, सामाजिक कार्याची जाण आहे आणि खेळ त्यांच्यासाठी जीवनशैलीचा भाग आहे. “मी जे ठरवते ते पूर्ण करते” हे त्यांचे व्यक्तिमत्त्व सांगून जाते.

नवीन पिढीसाठी त्या एक महत्त्वाचा संदेश देतात, सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका; स्वतःचे करिअर, शरीर आणि कुटुंबाला प्राधान्य द्या. व्यायाम, योगा किंवा कुठलीही चांगली आवड जोपासा. निरोगी शरीर हेच सुखी आयुष्याचा आधारस्तंभ आहे. पोलीस वर्दीतल्या ‘महाराष्ट्र श्री’ रेखा शिंदे यांचा प्रवास सर्व महिलांसाठी आणि तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो.

– ऐश्वर्या कुलकर्णी-म्हैसकर