कुळगाव-बदलापूर स्टेशन परिसर होणार अनधिकृत फेरीवालामुक्त

* पालिकेत फेरीवाल्यांवरून गदारोळ
* वादग्रस्त अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

बदलापूर: कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची सर्वसाधारण महासभा गुरुवारी वादळी ठरली. महासभेच्या सुरुवातीलाच पहिल्याच विषयावर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आणि त्यांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागाविरोधात संताप व्यक्त केला.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्या पक्षपाती कारभाराच्या मुद्द्यावरून सभागृहात तीव्र पडसाद उमटले. लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी विजय कदम यांची कालच तातडीने उचलबांगडी केल्याची माहिती दिली. तसेच पुढील आठ दिवसांत बदलापूर पूर्व आणि पश्चिम स्थानक परिसर अनधिकृत फेरीवालामुक्त करण्याचे आश्वासन दिले.

एकूण ४६३ विषय आणि तब्बल १८५ कोटींच्या विकासकामांवर चर्चा करण्यासाठी ही महासभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच विषयावर सभागृहातील वातावरण तापले. उपनगराध्यक्षा प्रियांका दामले यांनी अतिक्रमण विभागाचे अधिकारी विजय कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. अतिक्रमण विभागाकडून स्थानिक मराठी फेरीवाल्यांवर सर्रास आणि कठोर कारवाई केली जाते, परंतु त्यांच्याच बाजूला बसणाऱ्या परप्रांतीय व अनधिकृत फेरीवाल्यांवर मात्र कोणतीही कारवाई होत नाही.

हा भेदभाव संशयास्पद असून परप्रांतीय आणि बांगलादेशी फेरीवाल्यांकडून मोठे आर्थिक व्यवहार केले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. या मुद्द्यावर शैलेश वडनेरे, किरण भोईर, श्रीधर पाटील, संभाजी शिंदे आणि शीतल राऊत या सर्वच नगरसेवकांनी पक्षभेद विसरून एका सुरात अतिक्रमण विभागाच्या भ्रष्टाचारावर तीव्र नाराजी व्यक्त करत कदम यांच्या बदलीची मागणी लावून धरली. तर फेरीवालेमुक्त परिसर न झाल्यास उपोषणाला बसू, असा इशारा संभाजी शिंदे यांनी दिला.

सभागृहाचा वाढता रोष पाहता, मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारत कालच विजय कदम यांची पालिकेतून उचलबांगडी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या जागेवर आता नवीन आणि जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. तसेच, राजेंद्र घोरपडे व रती पातकर यांच्या सूचनेनुसार बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागासाठी दोन स्वतंत्र अधिकारी नेमण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले. पुढील आठ दिवसांत बदलापूर पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक परिसर पूर्णपणे अनधिकृत फेरीवालामुक्त केला जाईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.