वाशी-कोपरखैरणे मार्गावर ‘कुल’ प्रवास झाला स्वस्त

नवी मुंबई: सध्या बेस्टच्या कमी तिकीट दराच्या स्पर्धेत वाशी-कोपरखैरणे मार्गावरील एनएमएमटीची प्रवासी संख्या रोडावली आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवासी संख्या वाढावी म्हणून वातानुकूलित बसमधून कमीत कमी पाच रुपये ते १५ रुपयांपर्यंत तिकीट दर लागू करण्यात येणार आहे.

मागील चार ते पाच वर्षांपासून बेस्टचे तिकीट दर किमान पाच रुपयांवर आले आहेत. त्यामुळे बेस्टच्या बसला वाशी ते कोपरखैरणे मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्टच्या तुलनेत सध्या एनएमएमटीचे तिकीट दर जादा आहेत, त्यामुळे प्रवासी कमी झाले आहेत. सध्या साध्या बसमध्ये या मार्गावर 7 ते 10 रुपये तर वातानुकूलित बसमध्ये 12 ते 20 रुपये तिकीट आकारले जाते. परिणामी एनएमएमटीच्या तिकीट महसुलात घट होत आहे. विशेषतः एनएमएमटीच्या वाशी-कोपरखैरणे मार्गावर अधिक फटका बसत आहे. त्यामुळे वाशी-कोपरखैरणे मार्गावर लवकरच वातानुकूलित बसमधून किमान पाच रुपये तिकीट दर लागू करण्यात येणार आहे.

एनएमएमटीच्या वाशी-कोपरखैरणे मार्गावर एकूण १३४ बसच्या ५८६ बस फेऱ्या होतात. वाशी रेल्वे स्टेशन ते कोपरखैरणेअंतर्गत ५५ बस असून २४० फेऱ्या तर कोपरखैरणे ते पनवेल, नेरुळ, कळंबोली, तळोजा, खारघर या मार्गावर ७९ बस असून ३४० बसफेऱ्या होतात. बेस्टच्या तुलनेत दुप्पट तिकीट दराने एनएमएमटीचा प्रवास होता, मात्र आता वाशी-कोपरखैरणे मार्गावर सरळ मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित बसमध्ये किमान पाच रुपये ते १५ रुपये तिकीट दर लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता एनएमएमटी बसचा प्रवास देखील सोयीचा आणि स्वस्त ठरेल, तसेच एनएमएमटीची प्रवासी संख्याही वाढेल.