नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 74 ते 100 किलो खुल्या गटात कोल्हापूरच्या ओंकार चौगुले याने सोलापूरच्या सुरज मुलानी याच्यावर चुरशीच्या लढतीत मात करीत एक लाख रुपये रक्कमेच्या पारितोषिकासह मानाचा पट्टा व मानाची गदा पटकावली.
कुस्तीसारख्या मराठी मातीतील रांगड्या खेळाला प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका दरवर्षी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करीत असते. मागील दोन वर्षात कोरोना प्रभावामुळे खंडीत झालेली ही परंपरा यावर्षी पुन्हा उत्साहाने राबवत घणसोलीतील महानगरपालिका शाळा क्र.76/105 च्या मैदानावर 25 व 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या नवी मुंबई महापालिका चषक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला रसिकांची प्रचंड दाद मिळाली.
साता-याच्या सुमित गुजर याने 55 ते 65 किलो वजनी गटात सोलापूरच्या सागर राऊत यांच्यावर अंतिम सामन्यात मात करून नवी मुंबई महानगरपालिका राज्यस्तरीय कुमार केसरी मानाचा पट्टा व गदा मिळविली.