कोल्हापूरचा अजिंक्य रेडकर ठरला नवी मुंबई महापौर श्री

नेरूळच्या निरंत पाटील याने पटकावला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान

नवी मुंबई: राज्यभरातील शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिय असणा-या ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा’ आणि ‘नमुंमपा क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ विष्णुदास भावे नाटयगृहात अत्यंत जल्लोषात झाल्या.

राज्यभरातील विविध जिल्हयातून आलेल्या विविध वजनी गटाच्या 128 शरीरसौष्ठवपटूंमधून कोल्हापूरच्या अजिंक्य रेडकर यांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत दीड लाख बक्षिस रक्कमेसह ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठवपटू 2025 – 26’ किताबासह मानाचा नवी मुंबई महापौर श्री चषक स्विकारला. सोलापूरच्या पंचाक्षरी लोणार यांनी 50 हजार पारितोषिक रक्कमेसह राज्यस्तरीय उपविजेतेपद पटकाविले.

‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री 2025 – 26’ या नवी मुंबई महानगरपालिका स्तरीय स्पर्धेत सहभागी 71 स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवपटूचे नमुंमपा क्षेत्र श्री विजेतेपद 70 हजार पारितोषिक रक्कम व मानाच्या चषकासहीत नेरूळच्या निरंत पाटील यांनी पटकावले. नेरूळच्या अक्षय पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री स्पर्धेचे उपविजेतेपद 38 हजार रक्कमेसह संपादन केले.

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मोहम्मद जमाल, ठाणे यांनी ‘मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर’ किताब तसेच स्वप्निल सकपाळ, रायगड यांनी ‘बेस्ट पोझर’ किताब पटकाविला. या दोघांनाही प्रत्येकी 15 हजार रुपये रक्कमेची पारितोषिके प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आली.

एकूण 199 शरीरसौष्ठवपटूंच्या उत्साही सहभागातून यशस्वी झालेल्या या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते झाला.